Raj Kundra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Raj Kundra Case: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या केसेसमध्ये कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. मनी लॉन्ड्रिंग व्यतिरिक्त त्याच्यावर अश्लील मजकूर तयार करून तो विकल्याचाही गुन्हा दाखल आहे. आता कुंद्राने नुकतेच एएनआयला एक मुलाखत देऊन, तीन वर्षांचे मौन तोडत पोर्नोग्राफी प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. प्रदीर्घ काळ तपास आणि आरोपांचा सामना केल्यानंतर कुंद्राने आपल्या कुटुंबावरील आरोपांमुळे मौन तोडण्याचा निर्णय घेतला.

'शिल्पा शेट्टीचा संबंध नाही'-

राज कुंद्राने मुलाखतीमध्ये सांगितले, ‘शिल्पा शेट्टीने इथे स्वतःसाठी एवढे मोठे नाव कमावले आहे, तिने खूप मेहनत घेतली आहे.  हे अन्यायकारक आहे की वाद माझ्याशी निगडीत आहे आणि तुम्ही माझ्या पत्नीचे नाव गुंतवत आहात. शिल्पा शेट्टीचे नाव टाकल्यावर तुम्हाला क्लिकबेट मिळते म्हणून. मात्र यामुळे तुम्ही समोरच्याची प्रतिष्ठा खराब करत आहात. तिचा याच्याशी काही संबंध नाही, तिचे नाव गुंतवून तिची प्रतिष्ठा का खराब करत आहात? मी फक्त तिचा नवरा आहे, म्हणून?’

तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही माझ्यावर भाष्य करू शकता. मी 15 वर्षांपासून येथे आहे, आयपीएल संघाच्या मालकापासून ते एका व्यावसायिकापर्यंत, मी भारतात खूप गुंतवणूक केली आहे, म्हणून नक्कीच मला लोक ओळखत असतील. तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोलू शकता पण माझ्या कुटुंबावर जाऊ नका.’

पोर्नोग्राफी प्रकरणावर भाष्य-

ईडीने राज कुंद्रा आणि पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या तात्पुरत्या जप्त केलेल्या मालमत्तेवर, उद्योगपती राज कुंद्राने भाष्य करून आम्ही हा लढा जिंकू असे सांगितले. पोर्नोग्राफी प्रकरणावर, राज कुंद्रा म्हणाला, ‘यामागे नक्कीच कोणीतरी असेल. तुम्ही जेव्हा या देशात व्यवसाय करता तेव्हा साहजिकच तुम्ही मित्र आणि शत्रूही बनवता. मला एका व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याशी समस्या होती. एका ज्ञात शत्रूने हा सगळा खेळ करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू गोष्टी उघड झाल्या आणि मला त्याबाबत बरीच माहिती मिळाली. मी सीबीआयला पत्र लिहिले आणि मला माझ्या विरोधात असलेली नावे दिली. मला आशा आहे की चौकशी सुरू होईल आणि हे स्पष्ट होईल की, माझे नाव केवळ सूडबुद्धीने गोवण्यात आले आहे.’ (हेही वाचा: Pornography Case: पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा, Shilpa Shetty हिच्या घरी ईडीचे छापे)

तो पुढे म्हणतो, ‘आजपर्यंत, मी कोणत्याही पोर्नोग्राफीचा, अशा कोणत्याही प्रॉडक्शनचा, पॉर्नचा अजिबात भाग झालेलो नाही. माझ्यावर असे आरोप झाले, मात्र यात कोणतेही तथ्य किंवा पुरावे नसल्यामुळे मला जामीन देण्यात आला. मी काहीही चुकीचे केलेले नाही हे मला माहीत आहे. ॲप चालवण्याचा प्रश्न असेल तर, माझ्या मुलाच्या नावावर एक सूचीबद्ध कंपनी होती आणि आम्ही तंत्रज्ञान सेवा पुरवायचो. मीडिया म्हणते की राज कुंद्रा सर्व 13 ॲप्सचा किंगपिन आहे, मात्र मी फक्त सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या सहभागात आहे आणि त्या ॲपमध्ये काहीही चुकीचे चालवले जात नाही.’