ऑनलाईन चित्रपटांची तिकीट विक्री करणारे व्यासपीठ, बुकमायशोने (BookMyShow) आता आपली स्ट्रीम सर्व्हिस सुरू केली आहे. याद्वारे युजर्स बुकमायशोच्या अॅपवर ऑनलाईन चित्रपट पाहू शकतात. कंपनी वापरकर्त्यांना 600 हून अधिक चित्रपट आणि 72,000 तासांपेक्षा जास्त कंटेंट देत आहे. बुकमायशो स्ट्रीम सर्व्हिसमध्ये जगभरातील चित्रपटांची आणि कंटेंटची क्युरेटेड लायब्ररी असेल. यापैकी 22,000 हजार तासांपेक्षा जास्त कंटेंट हा खास असेल, जो फक्त बुकमायशोच्याच व्यासपीठावर लाँच केला जाईल. कंपनीने याला ट्रांझॅक्शनल व्हिडिओ ऑन डिमांड (TVOD) असे नाव दिले आहे.
कंपनीने युजर्सना चित्रपट सब्सक्रिप्शन आणि चित्रपट भाड्याने घेणे असे दोन पर्याय दिले आहेत. चित्रपटाची किंमत किंवा भाडे हे त्या-त्या चित्रपटावर अवलंबून असू शकते. ज्यांना अद्याप सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याची इच्छा नाही अशा लोकांसाठी ही सर्व्हिस खास ठरणार आहे. बुकमायशो स्ट्रीमवर दर शुक्रवारी अनेक मार्की प्रीमियर असतील.
बीएमएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सिनेमा) आशिष सक्सेना म्हणाले की, चित्रपटांना प्रीमियर, एक्सक्लुझिव्ह, वर्ल्ड सिनेमा, मिस्ड इन थिएटर्स, फेस्टिव्हल फेव्हरेट यासारख्या श्रेणीत आणण्यावर बीएमएस लक्ष केंद्रित करेल. या श्रेणी वापरकर्त्यांच्या स्वभाव, पसंती आणि मूडनुसार विभागल्या गेल्या आहेत. बुक माय शो वापरकर्त्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये कंटेंट देत आहे. यात इंग्रजी, हिंदी, मल्याळम, तेलगू, तामिळ, बंगाली, कन्नड, अरबी, फ्रेंच, गुजराती आणि इतर समाविष्ट आहेत. (हेही वाचा: अभिनेता Vivek Oberoi चे असेही एक रूप; 18 वर्षात जवळजवळ अडीच लाख कर्करोगग्रस्त मुलांना केली आहे मदत)
बुकमायशो स्ट्रीममध्ये सिनेमा प्रेमी ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट टेनेट, गॅल गॅडोट स्टारर वंडर वुमन 1984 आणि हॉरर फँटसी 'द क्राफ्ट: लीगेसी' असे चित्रपट पाहू शकतात. विशेषत: ज्यांचे थिएटरमध्ये हे चित्रपट पाहणे चुकले आहे त्यांच्यासाठी ही पर्वणी असेल. सक्सेना म्हणाले, हे व्यासपीठ सोनी पिक्चर्स, वॉर्नर ब्रदर्स आणि युनिव्हर्सल पिक्चर्ससह जागतिक नामांकित निर्मात्यांसह भागीदारीद्वारे हॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कंटेंट दाखवेल. चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच येथे चित्रपट दाखवला जाईल.