चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) अडचणी सतत वाढत आहेत. याआधी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून संबोधल्याने दिल्ली न्यायालयाने दिल्ली पोलिसांना अभिनेत्रीविरुद्ध एटीआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. आता कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील खार पोलिसांनी कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. अभिनेत्री कंगना रनौतचा नवीन चित्रपट 'मणिकर्णिका रिटर्न्स- द लीजेंड ऑफ दिद्दा’ (Manikarnika Returns: The Legend of Didda) कॉपीराइट वादात सापडल्याने महाराष्ट्रातील खार पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. 'दिद्दा: द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर' (Didda - Kashmir Ki Yodha Rani) पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी ही केस दाखल केली आहे.
वांद्रेच्या अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशानुसार खार पोलिसांनी या कंगनाविरूद्धची एफआयआर दाखल केला आहे. आशिष कौल यांनी कंगनावर कॉपी राईट उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.आशिष कौल यांनी दावा केला आहे की, 'दिद्दा: द वॉरियर क्वीन ऑफ कश्मीर' या कथेचे हक्क त्यांच्याजवळ आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे आणि कंगनाने त्यांना न विचारता या पुस्तकावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली. त्यामुळे कंगनाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या कलम 405, 415, 120 बी आणि कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा. या प्रकरणाची माहिती देताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी पुढील कार्यवाही व तपास सुरू आहे.
14 जानेवारीला कंगना रनौतने 'काश्मीरची वॉरियर क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिद्दावर आधारित 'मणिकर्णिका रिटर्न्स- द लीजेंड ऑफ दिद्दा’ हा आपला नवीन चित्रपट बनवण्याची घोषणा केली. पण या घोषणेसह तिचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. 2019 मध्ये, 'दिद्दा: द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर'चे लेखक आणि दिद्दाचे वंशज आशिष कौल यांनी कंगना राणौतवर त्यांच्या इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे कॉपीराइट उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. (हेही वाचा: Bombay Begums Controversy: 'तांडव' नंतर आता Netflix ची सिरीज 'बॉम्बे बेगम्स' वादाच्या भोवऱ्यात; 24 तासात अहवाल सादर करून प्रसारण रोखण्याचा NCPCR चा आदेश)
आशिष कौल यांनी ‘आज तक’ला सांगितले की, ‘संपूर्ण जगाला ठाऊक आहे की दिद्दाची कहाणी माझ्या कुटुंबातून वारसाहक्काने मिळाली होती. ही गोष्ट मी माझ्या आजीकडून ऐकली होती, त्यानंतर अनेक वर्षांच्या मेहनतनंतर मी त्यावर फक्त एक पुस्तकच लिहिले नाही तर, ती कथा रायटर्स एसोसिएशन आणि दिल्लीला जाऊन कॉपीराईटदेखील केली. पण हे सर्व करूनही कंगना आणि चित्रपट निर्माते कमल जैन मला चुकीचे सिद्ध करून माझ्या पुस्तकावर चित्रपट बनवत आहेत.’