Karan Johar (Photo Credits: Instragram)

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा (Drug Case) विषय वादाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना समन्स बजावण्यात आले असून त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. यात दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरसह बरीच मोठी नावे सामील आहेत. आता यामध्ये अजून एका प्रसिद्ध व्यक्तीचे नाव समाविष्ट झाले आहे. चित्रपट निर्माता/दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याला एनसीबीने (NCB) चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीचे म्हणणे आहे की करण जोहर कोणत्याही परिस्थितीत संशयित नाही, फक्त ड्रग्ज प्रकरणात त्याच्याकडून काही माहिती घायची आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओबद्दल करण जोहरला अँटी ड्रग्स एजन्सी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी बोलावले आहे. एजन्सीने करणला या पार्टीबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. मुंबई एनसीबीने यासंदर्भात करण जोहरला नोटीस बजावली आहे. करणला काही प्रश्नांची उत्तरे देणे भाग आहे, ज्यामध्ये पार्टीमध्ये कोणकोणते अभिनेते-अभिनेत्री सामील होते? ही पार्टी कधी झाली? यामध्ये ड्रग्जचा वापर झाला होता का नाही? स्वत: करणने शूट करून पोस्ट केलेला व्हिडिओ कोणत्या कॅमेर्‍याने शूट केला होता? असे प्रश्न समाविष्ट आहेत.

बुधवारी करण जोहरला समन्स पाठवण्यात आले आहे. शुक्रवार (18 डिसेंबर) पर्यंत वरील सर्व माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, करण जोहरला स्वत: एनसीबीसमोर हजर होण्याची गरज नाही, तो त्याच्या कोणत्याही प्रतिनिधीस पाठवू शकतो. दरम्यान, बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर करण जोहरच्या अडचणी वाढू लागल्या होत्या. करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावर अनेकांनी आक्षेप घेऊन या पार्टीमध्ये ड्रग घेतल्याचा आरोप केला होता. (हेही वाचा: Urmila Matondkar चं Instagram Account रिस्टोर; मुंबई पोलिसांचे मानले आभार)

याआधी ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन्सचे कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद याला अटक केली होती.