जयललिता यांचा बायोपिक 'थलाइवी'चा फस्ट लुक आणि टीझर प्रदर्शित (Watch Video)
Thalaivi (Photo credit - Twitter)

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा (Kangana Ranaut) आगामी चित्रपट 'थलाइवी' (Thalaivi) चा फस्ट लुक रिलीज झाला आहे. यामध्ये कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता (Former Chief Minister Jayalalithaa) यांच्या सारखी दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सुप्रसिद्ध दिग्दर्शक ए.एल. विजय यांनी केले आहे. तमिळमध्ये या चित्रपटाचे नाव 'थलाइवी' आणि हिंदीमध्ये 'जया' असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा फस्ट लूक कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा चित्रपट 26 जून 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये तयार करण्यात येणार आहे. 'थलाइवी' चित्रपटात तमिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांची भूमिका अरविंद स्वामी साकारणार आहेत. एमजीआर आणि जयललिता यांनी 28 सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले आहे.

या चित्रपटासाठी कंगनाने 20 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याची चर्चा आहे. जयललिता यांच्या रुपात दिसण्यासाठी कंगनाने 'प्रोस्थेटिक मेकअप'चा आधार घेतला आहे. मात्र, कंगनाचा मेकअप नेटिझन्सना आवडलेला नाही. कंगनाच्या या लूकवरुन नेटिझन्स तिची खिल्ली उडवत आहेत.