Shahid Kapoor च्या 'कबीर सिंग' सिनेमाच्या सेटवर अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू
Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

शहीद कपूरच्या (Shahid Kapoor) आगामी 'कबीर सिंग' (Kabir Singh) या सिनेमाच्या शुटींगदरम्यान एक दुदैवी घटना घडली आहे. एका क्रू मेंबरचा अपघाती मृत्यू झाला आहे. शुटिंगमध्ये जनरेटर हाताळणार्‍या 35 वर्षीय राम कुमार (Ram Kumar) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या 'कबीर सिंग' या सिनेमाचं शुटिंग उत्तराखंड या भागातील मसुरीमध्ये सुरू आहे. येथेच ही सुन्न करणारी घटना घडली आहे.

शुटिंगदरम्यान सेटवर जनरेटर मागवण्यात आला होता. या जनरेटरमध्ये पाण्याची पातळी तपासण्यासाठी राम कुमार गेला. मात्र मफलर पंख्यामध्ये अडकला आणि दुर्दैवी प्रकार घडला. मफलरसोबत पंख्यामध्ये राम आतमध्ये खेचला गेला. याप्रकारामध्ये राम कुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांसाठी त्याला दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

राम कुमार हा मूळचा मुजफ्फरनगर येथील कोनोनी या गावाचा आहे. या अपघातानंतर पोलिस तक्रार करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. सध्या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

'कबीर सिंग' या सिनेमामध्ये शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. दुर्घटनेच्या वेळेस दोघेही कलाकार सेटवर उपलब्ध नव्हते.