Amitabh Bachchan, Shah Rukh Khan, Akshay Kumar (Photo Credits: Twitter)

फोर्ब्स एशियाने 100 डिजिटल स्टार्सची (Forbes Asia’s 100 Digital Stars) नवीन यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये सोशल मीडियावरील काही प्रभावशाली सेलिब्रिटींचा समावेश आहे. बॉलिवूडबरोबरच टेलिव्हिजन आणि म्युझिक इंडस्ट्रीमधील अनेक स्टार्सनीही या यादीमध्ये स्थान मिळवले आहे. 'डिजिटल स्टार्स'च्या या यादीमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा समावेश झाला आहे. भारतामध्ये अमिताभ यांचा सोशल मीडियावरील प्रेझेन्स सर्वात जास्त आहे. डिजिटल स्टार्सच्या या 100 सेलिब्रिटींच्या यादीत अमिताभ बच्चन यांच्यासह 10 भारतीय स्टार्सचा समावेश आहे. यामध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि हृतिक रोशन यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.

या यादीमध्ये कतरिना कैफ, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिज, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, गायिका श्रेया घोषाल आणि नेहा कक्कर यांचादेखील समावेश आहे. फोर्ब्स एशियाच्या 100 डिजिटल स्टार्सच्या यादीमध्ये अशा ख्यातनाम व्यक्तींना समाविष्ट करण्यात आले आहे ज्यांनी, शारीरिकदृष्ट्या सहभागी होणारे कार्यक्रम रद्द होऊनही तसेच इतर क्रियाकलाप बंद असूनही, आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे, जागरूकता वाढवली आहे, आशावादाला प्रेरणा दिली आहे आणि कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान सोशल मीडियाचा वापर करून मदत प्राप्त केली आहे.

या यादीमध्ये कोविड-19 मदतीसाठी 70 लाख डॉलर्स जमा करण्याचे श्रेय बिग बी यांना देण्यात आले आहे. अक्षय कुमारला बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून गौरविण्यात आले आहे. अभिनेत्याने भारतात कोविड-19 साठी मदत म्हणून 40 लाख डॉलर्सचे दान केले. तसेच मेमध्ये फेसबुक लाइव्हद्वारे फंड उभारण्यासाठी आयोजित 'आय फॉर इंडिया'मध्ये भाग घेतला. याद्वारे कोरोना लढाईसाठी 52 कोटी रुपये उभे केले गेले. (हेही वाचा: यंदा IPL ठरली गुगलवरील Top Trending Query; जाणून घ्या सरत्या वर्षात सर्वाधिक सर्च झालेल्या Top 10 गोष्टी)

फोर्ब्स एशियाच्या 100 डिजिटल स्टार्सच्या यादीमध्ये सोशल मीडिया पोहोच आणि सहभाग, त्यांचे अलीकडील कार्य, परिणाम आणि पुरस्कार, ब्रँड समर्थन आणि व्यवसाय प्रयत्नांवर आधारित उमेदवारांचे मूल्यांकन केले जाते. तसेच, स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील त्यांचे प्रोफाइल देखील विचारात घेतले जाते.