गेले काही दिवसांपासून गाणकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांनी मंगळवारी ब्रीच कँडी रुग्णालयात, गायिका लता मंगेशकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून, दीदींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली. मधुर यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘रुग्णालयात जाऊन मी लता मंगेशकर यांची भेट घेतली. हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे की, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारांचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर होत आहे. लतादीदींच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद.'
मधुर भंडारकर पोस्ट -
भारताच्या कोकिळेला गेल्या आठवड्यात, 'व्हायरल चेस्ट कन्जेशन' झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीदींना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र आता मधुर भंडारकर यांच्या पोस्टमुळे लतादीदींच्या करोडो चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. 90 वर्षांच्या लता मंगेशकर यांचे चाहते केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. म्हणूनच आज लतादीदींच्या आरोग्याबद्दल सर्वजण चिंतेत आहेत, मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे की, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत आहे. (हेही वाचा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांची कॅंडी ब्रीच रुग्णालयात जाऊन घेतली भेट)
दरम्यान, सात दशकांपेक्षा जास्त काळच्या आपल्या कारकीर्दीत लता मंगेशकर यांनी, वेगवेगळ्या भाषांमधील 30 हजाराहून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. 2001 मध्ये मंगेशकर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात आला. तर त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.