Sonu Sood चा जबरा फॅन; अभिनेत्याला भेटायला हैद्राबादवरून अनवाणी चालत आला मुंबईला, जाणून घ्या सोनू सूदची प्रतिक्रिया 
सोनू सूदचा चाहता (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) सध्या कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. कोरोना व्हायरसदरम्यान त्याच्या निस्वार्थी कार्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. गेले दीड वर्षे सोनू सूद जे काम करत आहे ते पाहून त्याचे फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. आता सोनू सूदने त्याच्या एका चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो त्याला भेटण्यासाठी हैदराबादहून (Hyderabad) मुंबईला अनवाणी पायांनी चालत आला होता. 47 वर्षीय अभिनेत्याने कॅप्शनमध्ये सांगितले की, त्याने आपल्या चाहत्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली होती, परंतु त्याने पायीच प्रवास करण्याचा पर्याय निवडला.

सोनू सूदने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोत तो त्याच्या एका चाहत्याबरोबर पोज देताना दिसत आहे. या फोटोत त्याचा चाहता हातात त्याच्या आवडत्या हिरोचे पोस्टर घेऊन उभा आहे. या पोस्टरवर 'हैदराबाद ते मुंबई' असे लिहिलेले आहे.

आपल्या चाहत्यासोबतच फोटो शेअर करताना सोनूने लिहिले- 'व्यंकटेश, हा मुलगा मला भेटायला हैदराबादहून मुंबईला अनवाणी पायाने आला आहे. येथे पोहोचण्यासाठी त्याच्या वाहतुकीची व्यवस्था केली होती मात्र तो पायीच आला. ही गोष्ट खरोखर प्रेरणादायी आहे आणि याबद्दल मी कृतज्ञ आहे.’ यासह, अभिनेत्याने आपल्या सर्व चाहत्यांना विनंती केली आहे की, 'कृपया! असा त्रास घेण्यासाठी मी कोणालाही प्रोत्साहन देत नाही. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो.’ (हेही वाचा: Sonu Sood ची मोठी घोषणा; देशात 15 ते 18 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स स्थापन करणार)

दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाने जेव्हा भारतामध्ये पाय रोवायला सुरुवात केली, तेव्हा सोनू सूद रस्त्यावर उतरला आणि अडचणीत आलेल्या मजुरांना व गरजूंना घरी जाण्यासाठी मदत केली. त्यानंतर त्याने अनेकांना घरे व नोकऱ्या मिळवून देण्यासाठीही मदत केली. आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही त्याची सार्वजनिक सेवा सुरू आहे. सामान्य लोक सोनू सूदला देव मानू लागले आहेत आणि सेलिब्रेटीही त्याचे कौतुक करत आहेत. बेड मिळवून देणे असो वा ऑक्सिजनचा पुरवठा करणे असो, सोनू सूदने आपल्या मदतीने या महामारीमध्ये अनेकांचे प्राण वाचवले आहेत.