रजनीकांत यांच्या 'Darbar' चित्रपटामुळे कोट्यावधींचे नुकसान; वितरक बसणार उपोषणाला, दिग्दर्शकाने मागितले पोलीस संरक्षण
Darbar First Look Poster (Photo Credits-Twitter)

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचे चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतात, तेव्हा तो प्रसंग त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सवासारखाच असतो, सहसा रजनीकांतचे चित्रपट निर्मात्यांपासून वितरकांपर्यंत सर्वांनाच फायद्याचे ठरतात. मात्र अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या चित्रपटाने त्यांना धक्का दिला आहे. व्यापार तज्ज्ञांच्या मते, रजनीकांतच्या 'दरबार' (Darbar) चित्रपटाने जगभरात 250 कोटींची कमाई केली आहे. असे असूनही या चित्रपटाचे 70 कोटींचे नुकसान झाले आहे.

या चित्रपटाचे बजेट 200 कोटी होते, त्यापैकी निम्मी रक्कम रजनीकांतची फी होती. वृत्तानुसार, या चित्रपटामुळे वितरकांना खूप तोटा सहन करावा लागला आहे.

चित्रपटाच्या खराब प्रदर्शनामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. वितरकांच्या एका गटाने नुकसान भरपाई मागितल्यानंतर, चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादोस (A.R. Murugadoss) यांनी त्यांच्या संरक्षणाची बाजू मांडली आहे. दिग्दर्शकाने मद्रास उच्च न्यायालयात आपली याचिका दाखल केली असून, आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. वितरकांनी याबाबत रजनीकांत यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या पदरी निराशा आली. अनेक क्षेत्रातील वितरकांचे लक्षणीय नुकसान झाले आहे आणि म्हणूनच त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Rajinikanth Craze: रजनीकांत यांचा 'Darbar' चित्रपट पाहण्यासाठी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना भर पगारी रजा, फ्री मूव्ही तिकिट्स)

एएनआयच्या म्हणण्यानुसार, मुरुगादोस यांनी चित्रपटाविषयी असंतुष्ट वितरकांमुळे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. वितरकांनी जाहीरपणे दावा केला आहे की त्यांना 25 कोटींचे नुकसान झाले आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करण्याचे काम मुरुगादोस यांनी केले आहे. याची निर्मिती अल्लाईराजा सुभाषकरण यांनी केली आहे. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त नयनतारा, निवेथा थॉमस आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. 9 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटात 27 वर्षानंतर रजनीकांत एका पोलिसाच्या भूमिकेत दिसले आहेत.