Dadasaheb Phalke Award: अभिनेता रजनीकांत यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा
Rajinikanth | (Photo Credits: Facebook)

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी गुरुवारी (1 एप्रिल) ही घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. कोरोना व्हायरस संसर्गामुळे देशातील सर्वच पूरस्कार जाहीर होण्यास काहीसा उशीर होतो आहे. राष्ट्रीय पुरस्कारही नुकतेच जाहीर झाले आहेत.

रजनीकांत हे आज जरी रसीकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असले तरी, त्यांचे लहानपण अधिकच खडतर गेले आहे. अनेकांच्या आयुष्यात येतात तशा आर्थिक अडचणी त्यांच्याही आयुष्यात आल्या होत्या. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड अस आहे. शिवाजीराव गायकवाड यांचा पुढे जाऊन रजनीकांत झाला. रजनीकांत पाच वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे आयुष्य अधिक खडतर गेले.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टरची नोकरी करत असत. रजनीकांत यांनी बालचंद्र यांच्या 'अपूर्वा रागनगाल' तामिळ फिल्म इंडस्ट्रीमंध्ये पदार्पण केले. या चित्रपटात कमल हसन आणि श्रीविद्या होत्या. रजनीकांत यांनी अभिनयाची सुरुवात कन्नड नाटकांतून केली होती. त्यांनी एका नाटकात साकारलेली दुर्योधनाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

रजनीकांत यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांचे चित्रपट नेहमीच सुपरहीट होत आले आहेत. काही चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिकाही केल्या आहेत. त्यांची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की, लोकांनी चक्क त्यांचे मंदीर बांधले आहे.