कोरोना व्हायरस बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शाहरुख खान याने दिली ऑफिसची जागा; BMC ने ट्विट करत मानले आभार
Shah Rukh Khan (Photo Credits: Facebook SRK FanPage)

कोरोना व्हायरसच्या या महाभयंकर लढ्यात सर्वच स्तरातून आपल्या परीने मदत केली जात आहे. बॉलिवूड सेलिब्रेटी देखील या लढ्यात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याने आर्थिक मदतीसह अनेक स्तरावर सहकार्य दाखवले आहे. त्याने आपल्या ऑफिसची जागा कोरोना बाधितांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला दिली आहे. कोरोना रुग्णांचा देशातील वाढता आकडा लक्षात घेता अधिकाधिक विलगीकरण कक्षाची गरज भासू शकते. याच विचारातून त्याने आपल्या ऑफिसचे रुपांतर विलगीकरण कक्षात करण्याची तयारी दर्शवली आहे. शाहरुखच्या या सहकार्याबद्दल मुंबई महानगरपालिकेकडून त्याचे आभार मान्यात आले आहेत.

बीएमसीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत शाहरुख आणि गौरीचे आभार मानले आहेत. बीएमसीच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, 4 मजली वैयक्तिक ऑफिसची जागा विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी दिल्याबद्दल शाहरुख आणि गौरी खान यांचे धन्यवाद. यात लहान मुले, महिला आणि जेष्ठ कोरोना बाधित व्यक्तींना ठेवण्यात येईल. ही गरजेसाठी केलेली अत्यंत विचारपूर्वक कृती आहे. (कोरोना विरुद्धच्या लढ्यात आर्थिक मदतीसह शाहरुख खान याचा शाब्दिक आधार; मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देण्यासाठी चक्क मराठी भाषेतून ट्विट)

BMC Tweet:

यापूर्वी शाहरुख खान याने कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात आर्थिक योगदान दिले आहे. त्याचबरोबर वेळोवेळी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शाब्दिक आधार दिला आहे. त्यानंतर आता विलगीकरण कक्षासाठी ऑफिसची जागा देऊन वेळप्रसंगी सहकार्य दाखवले आहे.