प्रसिद्ध गायक अदनान सामी ला 'पद्मश्री' देण्यावर मनसे पाठोपाठ काँग्रेसचाही विरोध
Adnan Sami and Jaiveer Shergill (Photo Credits: Facebook)

काही दिवसांपूर्वी पद्मश्री देण्यात येणा-या कलावंतांची घोषणा झाली. यात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar), अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्या नावांसह अदनान सामीला (Adnan Sami) पद्मश्री मिळणार असल्याची घोषणा झाली. प्रसिद्ध गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मनसे पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्यापाठोपाठ आता काँग्रेस पक्षानेही अदनान सामीच्या पुरस्कारावर आक्षेप घेतला आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केंद्राच्या निर्णयाला तीव्र आक्षेप घेतला आहे.

अदनान सामीचे वडील पाकिस्तानी हवाई दलात अधिकारी होते. त्यांनी भारताविरुद्ध गोळीबार केला होता. असं असताना त्यांच्या मुलाला गौरवण्यात येत आहे. भाजपची चमचेगिरी हा सध्या पुरस्कारांचा मापदंड झाल्याची टीकाही त्यांनी केली. सामीला गौरवताना कारगिल युद्धात पाकविरुद्ध लढणारे मोहम्मद सनाउल्लाह यांना मात्र एनआरसीच्या माध्यमातून घुसखोर घोषित करण्यात आलं आहे, असा आरोप जयवीर शेरगिल यांनी केला आहे.

हेदेखील वाचा- अदनान सामी याच्या पद्मश्रीला 'मनसे'चा विरोध; पुरस्कार त्वरित रद्द करण्याची मागणी

जयवीर शेरगिल सह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सरकारवर टीका केली आहे. 'सामी हा काही दिवसांपूर्वीपर्यंत पाकिस्तानी नागरिक होता. त्याला 'पद्मश्री' देऊन गौरवणं हा सामान्य भारतीयांना धक्काच आहे. केंद्र सरकारनं याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

सर्वात आधी मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सामीच्या पद्मश्री बाबत आक्षेप नोंदविला होता. 'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये,हे मनसे च ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध करत अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेने केली होती.