
Betting Apps Promotion Case: दक्षिणेतील अनेक स्टार सध्या ईडी (ED) च्या रडारवर आहेत. ईडीने तेलंगणातील एक-दोन नव्हे तर 29 स्टार्सविरुद्ध बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या यादीत साऊथचे लोकप्रिय अभिनेते विजय देवेराकोंडा, प्रकाश राज, प्रणिता सुभाष, मंचू लक्ष्मी आणि राणा दग्गुबती अशी अनेक मोठी नावे आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल कलाकारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विजय देवेराकोंडा, राणा दग्गुबती, मंचू लक्ष्मी, प्रकाश राज, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला आणि श्रीमुखी यांच्यासह 29 प्रसिद्ध स्टार्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीचा हा खटला हैदराबाद सायबराबाद पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. (हेही वाचा - Alia Bhatt PA Fraud: आलिया भट्टच्या माजी सहायिकेने ₹76.9 लाखांची फसवणूक; बेंगळुरूहून अटक)
मियापूर येथील 32 वर्षीय व्यावसायिक फणींद्र शर्मा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अनेक तरुण आणि सामान्य लोक या बेटिंग अॅप्समध्ये पैसे गुंतवत आहेत. या अॅप्सना अनेक लोकप्रिय स्टार्सनी प्रमोट केले आहे. तक्रारीत म्हटले आहे की अशा अॅप्समुळे निम्न आणि मध्यम वर्गातील कुटुंबांना आर्थिक संकटात टाकले जात आहे.
तथापी, पोलिसांनी म्हटलं आहे की, या अॅप्समध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार होतात. हे अॅप्स तरुणांना साध्या आणि सोप्या पद्धतीने कमाई करण्याचे आमिष दाखवतात आणि आर्थिक आणि मानसिक नुकसान पोहोचवत आहेत. याशिवाय, विजयच्या टीमने या प्रकरणावर स्पष्टीकरण देखील दिले आहे. अभिनेत्याच्या टीमचे म्हणणे आहे की कौशल्य-आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म A23 ची जाहिरात करण्यात आली होती, जी 2023 मध्येच संपली.