Kangna Ranaut (Photo credits: Twitter @TeamKanganaRanautOfficial)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश वांद्रे मजिस्ट्रेट कोर्टाने (Bandra Magistrate Court) दिले आहेत. मजिस्ट्रेट कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यात कंगनाने प्रक्षोभक ट्विटद्वारे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. मोहम्मद इकबाल सैयद यांनी ही याचिका दाखल केली होती. तसंच बॉलिवूड मध्ये हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

कंगना रनौत सातत्याने बॉलिवूडला बदमान करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया माध्यमं, टिव्ही, न्यूज याद्वारे कंगना बॉलिवूडबद्दल वादग्रस्त विधानं करत आहे. सातत्याने बॉलिवूडमधील नेपोटिज्म आणि फेवरेटिज्म बद्दल बोलून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाल्यानंतर कंगना विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, कंगना रनौत विरुद्ध आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. तसंच गरज भासल्यास चौकशी देखील केली जाईल, असे बोलले जात आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर कंगना रनौत हिने बॉलिवूड मधील नेपोटिज्मचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. त्यानंतर सातत्याने वादग्रस्त ट्विट्सची मालिका सुरुच आहे. मुंबई पोलिस, मुंबईतील सुरक्षितता, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आता तिने थेट बॉलिवूड विश्वावर बोट उचलले आहे.

दरम्यान, आज कंगनाने युजर्सच्या ट्विटला उत्तर देतना लिहिले की, "दुसऱ्या महायुद्धात 5-6 मिलियन ज्यू धर्मीयांच्या हत्येवर पाश्चिमात्य देशात आजही चित्रपट बनवले जातात. तुम्हाला माहित आहे त्यात किती हिंदू मारले गेले होते? ज्यू च्या 100 पटीने अधिक. मग त्यावर अद्याप एकही सिनेमा का नाही?"

तर दुसऱ्या एका युजर्सला उत्तर देताना कंगना लिहिते, "जर हिंदूंनी शांततेचा मार्ग अवलंबला असता तर बॉलिवूडमध्ये एकही हिंदू उरला नसता. बॉलिवूडमध्ये आमच्या धर्मावर अनेक सिनेमे बनतात आणि त्यांना आमच्याच धर्माची भीती वाटते." यापूर्वी तिने बॉलिवूड शब्द हॉलिवूड मधून चोरला असून अशा बॉलिवूड शब्दावर बहिष्कार टाका, असे वादग्रस्त ट्विट केले होते.