Annapoorani Controversy: नेटफ्लिक्सवरून काढला 'अन्नपूर्णी' चित्रपट; 'प्रभू रामाचा अनादर' केल्याप्रकरणी अभिनेत्री Nayanthara विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Annapoorani Controversy (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या वर्षी 'जवान' या चित्रपटात आपल्या जबरदस्त भूमिकेने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) सध्या तिच्या 'अन्नपूर्णी’ (Annapoorani) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबाबतचा वाद चांगलाच वाढला असून चित्रपट निर्मात्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. याआधी मुंबई पोलिसांनी निर्मात्यांविरोधात एफआयआरही नोंदवला होता. शिवसेनेचे माजी नेते रमेश सोळंकी यांनी नयनताराच्या 'अन्नपूर्णी' चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. आता चित्रपटाबाबत होत असलेला विरोध निर्मात्यांना चांगलाच महागात पडत आहे. 'अन्नपूर्णी’ चित्रपटाविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर नेटफ्लिक्स इंडियाने हा चित्रपट आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे.

अन्नपूर्णी या मूळ तमिळ चित्रपटात भगवान राम यांना मांसाहारी दाखवण्यात आले आहे. इतकेच नाही तर त्यांना मांसाहार करतानाही दाखवण्यात आले होते, ज्यावर जोरदार टीका होत आहे. माहितीनुसार, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री नयनतारा हिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माता आणि नेटफ्लिक्स इंडिया कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका संस्थेने नयनतार हिच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीत अभिनेत्रीवर भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासह चित्रपटातून 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (हेही वाचा: Merry Christmas Advance Booking: कैटरीना कैफ आणि विजय सेतुपतिच्या मेरी ख्रिसमस चित्रपटाच्या अॅडव्हान बुकिंगला सुरुवात)

या होत असलेल्या टीकेनंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि आपली बाजू लोकांसमोर मांडली. झी स्टुडिओने म्हटले आहे की, 'चित्रपटाचे सहनिर्माते या नात्याने हिंदू आणि ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही आणि संबंधित समुदायांच्या भावना दुखावल्या आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू इच्छितो.'

निर्मात्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आक्षेपार्ह दृश्य संपादित केले जाईल आणि आवश्यक बदल करेपर्यंत हा चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढून टाकण्यात येईल. या बदलानंतरच प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहता येणार आहे. 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'अन्नपूर्णी’ 29 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला होता.