परप्रातीयांना घरी पाठवल्यावर सोनू सूद आता किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी घेऊन येणार; 22 जुलैसाठी पहिले चार्टर्ड विमान बुक
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणू (Coronavirus) काळात, एका अभिनेत्याने खरा हिरो बनून देशातील अनेक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना वेळेवर मदत केली. लॉक डाऊनमध्ये अनेक लोकांना या अभिनेत्याने आपल्या घरी जाण्यास मदत केली, तो म्हणजे सोनू सूद  (Sonu Sood). अभिनेता सोनू सूद हा आज प्रत्येकाच्या ओठावर चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्रातून हजारो परप्रांतीयांना आपल्या गावी-घरी पाठवल्यानंतर आता सोनू पुन्हा एकदा नव्या कामाला लागला आहे. रशिया जवळ किर्गिस्तान (9Kyrgyzstan) मध्ये अडकलेल्या 3,000 भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी सोनू सूद प्रयत्न करत आहे. पैकी झारखंड आणि बिहारमधील वैद्यकीय विद्यार्थी लवकरच भारतामध्ये येतील.

बॉलिवूड स्टार सोनू सूद, बहरागौडाचे माजी आमदार कुणाल सारंगी आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा मिश्रा यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे झारखंडमधील विद्यार्थ्यांपैकी एक सद्दाम खान याने सांगितले आहे. हे भारतीय विद्यार्थी एशियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहेत. सद्दामने सांगितले की, या प्रवासासाठी सोनू सूदने सांगितले आहे की या विद्यार्थ्यांना कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाही.

सोनू सूद ट्वीट-

याआधी सोनूने ट्वीट करत माहिती दिली होती की, 'किर्गीस्त्तानमधील विद्यार्थ्यांनो, आपल्या बचावाच्या संदर्भात कोणत्याही माहितीसाठी कृपया आम्हाला sonu4kyrgyzstan@gmail.com वर मेल करा. भारतीय विद्यार्थ्यांच्या बचावासाठी फक्त हाच ई-मेल आयडी वापरला जाणार आहे. लक्षात असु द्या या गोष्टीसाठी टीम सोनू सूद कोणत्याही प्रकारे शुल्क आकारत नाही.' (हेही वाचा: अभिनेत्री कंगना रनौतला मिळाली BJP खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची साथ; 'Guts' च्या बाबतीत एक नंबर म्हणत, कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी करणार मदत)

त्यानंतर आता सोनू सूदने या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 22 जुलै रोजीसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक-वाराणसी (Bishkek –Varanasi) दरम्यान चार्टर्ड विमान बुक केले आहे. सोनू सूदने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. तसेच इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठीही या आठवड्यात चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली जाईल असे सोनूने सांगितले आहे.