Akshay Kumar नंतर 'Ram Setu' च्या सेटवर 45 जणांना कोरोनाची लागण
Photo Credit : Instagram

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी वा-यासारखी पसरली. स्वत: अभिनेत्याने याबाबत माहिती दिली. त्यापाठोपाठ आता त्याचा आगामी चित्रपट 'राम सेतु' (Ram Setu) बाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अक्षय कुमार पाठोपाठ राम सेतुच्या सेटवर 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आज मडमधील 'राम सेतु' च्या सेटवर 100 जण कामाला सुरुवात करणार होते. मात्र अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने या सिनेमाचा भाग बनणाऱ्यांसाठी करोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. यात 100 जणांपैकी 45 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 45 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंड‍िया सिने एंप्लॉइज (FWICE) चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, "राम सेतु सिनेमाची संपूर्ण टीम सर्व प्रकारची खबरदारी बाळगत आहे. दुर्दैवाने ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या 45 लोकांना करोनाची लागण झाली आहे. ते सर्व क्वारंटाइन आहेत."हेदेखील वाचा- अक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल; चाहत्यांना दिला काळजी घेण्याचा सल्ला

अक्षय कुमारसह 45 जणांना करोनाची लागण झाल्यानंतर 5 एप्रिलपासून मुंबईत सुरु होणारं ‘राम सेतु’ सिनेमाची शूटिंग बंद करण्यात आलं आहे. जवळपास 15 दिवस शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. अक्षय कुमारला करोनाची लागण होण्यापूर्वी तो राम सेतुचं शूटिंग करत होता.

दरम्यान काल अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. मात्र आज त्याने सोशल मिडियावर माहिती देत आपण बरे असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल झालो आहोत असे सांगितले. तसेच अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला असून प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी त्याच्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी आभार मानले आहेत.