बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बाबू यांच्या जीवनावर बायोपिक; उलगडणार वादग्रस्त आयुष्य
Asaram Bapu (Photo Credits: PTI)

सध्या बायोपिक चित्रपटाचा ट्रेंड आहे, विविध क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तींचे जीवन अशा चित्रपटांमुळे जनतेसमोर आले. नरेंद्र नोदी यांचा बायोपिक सध्या चर्चेत असताना आता या चर्चेत एक वादग्रस्त नाव सामील होत आहे. बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेले स्वयंघोषित बाबा आसाराम बापू (Asaram Bapu) यांच्या जीवनावर बायोपिक बनत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते सुनील बोहरा (Sunil Bohra) या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट पत्रकार उशीनर मजूमदार यांच्या 'गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ (GOD OF SIN: The Cult, Clout and Downfall of Asaram Bapu) या पुस्तकावर आधारीत असणार आहे.

सुनील बोहरा यांनी नुकतेच या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत. याआधी बोहरा यांनी 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'तनु वेड्स मनु', 'शाहिद' आणि 'द अॅक्स्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. आसाराम बापू यांच्या बायोपिकबद्दल बोलताना सुनील बोहरा म्हणाले, ‘या पुस्तकामधून आसाराम यांच्या जीवनातील अनेक घटना समोर आल्या आहेत, यामुळे मी खूपच प्रभावित झालो आहे. विशेषत: बलात्काराचा खटला आणि त्यासंदर्भातील अनेक लोकांनी हा चित्रपट बनवण्यासाठी मला प्रेरित केले.’ (हेही वाचा: आसाराम बापूचा मुलगा, नारायण साई बलात्कार प्रकरणात दोषी)

लवकरच सुनील या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु करणार आहेत, त्यानंतर या चित्रपटातील कलाकार निश्चित केले जातील. दरम्यान आसाराम बापू जोधपुरच्या न्यायालयात शिक्षा भोगत आहेत. बलात्काराच्याच आरोपाखाली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. नुकतेच आसाराम बापू यांच्या मुलगाही बलात्कार प्रकरणात दोषी ठरला आहे. शुक्रवारी सूरत येथील सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत त्याला दोषी ठरवले असून, आज शिक्षेची सुनावणी होणार आहे.