Haluvar Paule: अलिबाग, रेवदांड्यात उमटली प्रेमाची ‘हळुवार पाऊले...’, नव्या जोडीचं नवं रिफ्रेशिंग गाणं!

"हळुवार पाऊले वेचित साजरी किनारी आली, रुणझुणता पैंजण नाद बासरीत गुंफून गेली" अशा हळुवार ओळी असलेला नवाकोरा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिक या युट्यूब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे. हरीश वांगीकरनं या म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीसह संगीत आणि गायनाची जबाबदारी निभावली आहे. नव्या दमाच्या कलावंतांना संधी देणाऱ्या सप्तसूर म्युझिकने "हळुवार पाऊले" हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. अनिकेत जंगम यांनी गीतलेखन केलं आहे, तर सचिन अंबट यांनी म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे.

ऍडव्होकेट अनुजा चौधरीसह सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कार्यरत असलेला हरीश वांगीकर म्युझिक व्हिडिओमध्ये चमकला आहे. हरीशनं आतापर्यंत गायक, संगीतकार, अभिनेता म्हणून या पूर्वी काही म्युझिक व्हिडिओ केले आहेत, तर अनुजानं "असेही एकदा व्हावे" हा चित्रपट, शौर्य, कुसुम अशा काही मालिका केल्या आहेत. (हे देखील वाचा: Ya Baya Daji Ale Song: इर्सल'मध्ये दिसणार माधुरी पवारच्या नखरेल अदा, 'या बया दाजी आलं' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!)

"हळूवार पाऊले" हे प्रेमगीत आहे. कोकणातल्या नितांत सुंदर परिसरात या म्युझिक व्हिडिओचं नेत्र सुखद चित्रीकरण करण्यात आलं आहे. तर हलक्याफुलक्या शब्दांना तितकंच श्रवणीय संगीत ही या म्युझिक व्हिडिओची खासियत आहे. अनुजा आणि हरीश या जोडीच्या म्युझिक व्हिडिओतील सफाईदार वावरानं या गाण्याला चार चाँद लावले आहेत. प्रेमाची हळुवार भावना या गाण्यातून अप्रतिम पद्धतीनं सादर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा म्युझिक व्हिडिओ आवडेल यात शंकाच नाही.