आयुष्यभर चंदेरी दुनियेत, पैशांच्या झगमटात राहिल्यावर म्हातारपणी कोणी विचारायला नसणे अशी परिस्थिती अनेक कलाकारांची आपण पाहतो. गाठीला पैसे आहेत मात्र सांभाळ करायला कोणी नाही म्हणून अनेक कलाकार असेच प्राणत्याग करतात. हीच समस्या ओळखून अशा कलाकारांसाठी आता मुंबईजवळील कर्जत येथे वृद्धाश्रम उभारला जाणार आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) हिने याबाबत पुढाकार घेतला आहे. पाठपुरवठा करून तिने आश्रमासाठी कर्जत येथे जागा मिळवली आहे. एका संस्थेने स्वामीधाम मोग्रज आनंदवाडी कर्जत येथे कलाकार वृद्धाश्रमासाठी दीड एकर जागा दिलेली आहे.
याबाबत विशाखा म्हणते, ‘काही वयोवृद्ध कलाकार वाईट अवस्थेत दिसले. तेव्हापासून गेली काही वर्ष एक विचार डोक्यात घोळत होता. एकदा वय व्हायला लागलं की, आधाराला पटकन कोणी उभं राहात नाही. त्यामुळे आपणच आपला आधार व्हावं असं मनात आलं... अनेक वृद्धाश्रम असूनही कलाकारांसाठी एक वेगळे वृद्धाश्रम असावं असं वाटलं... जिथे म्हातारपणी गप्पांचा, अनुभवांचा फड जमेल. आपल्याच फिल्ड मधले लोक एकत्र असले की, आठवणी-कल्पना याला उधाण येतं. काळ सुखकर होतो... एकटेपण दूर व्हावा या संकल्पनेतून एकल्या किंवा एकट्या पडलेल्या वयोवृद्ध किंवा पन्नाशी ओलांडलेल्या कलाकार मित्र मैत्रिणींसाठी एक कलाश्रय सुरू करण्याचा विचार आहे.’
याबाबत तिने तिने जवळच्या मित्रांना एक मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये या उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केले गेले होते. 6 एप्रिलला याच ठिकाणी अन्नछत्राचे उद्घाटन आहे. त्याचवेळी वृद्ध कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱया या वृद्धाश्रमाचा श्रीगणेशा होणार आहे.