आजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

नवी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दुखःदायक बातमी आहे. कारण आजपासून गाड्यांची किंमती मध्ये वाढ झाली आहे. आजपासून थर्ड पार्टी विमाच्या (Third party insurance) किंमती वाढल्याने गाड्यांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. चारचाकी गाड्यांच्या विम्यामध्ये 12.5 टक्के तर दुचाकी गाड्यांच्या विम्यामध्ये 21 टक्के वाढ झाली आहे. यामुळेच थंडावलेल्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा (IRDA) कडून ही वाढ करण्यात आली आहे. नवीन गाडी खरेदी करताना दुचाकीसाठी 5 वर्षे तर चारचाकीसाठी 3 वर्षांचा विमा घेणे आवश्यक आहे.

नव्या नियमानुसार अशी झाली आहे वाढ –

चारचाकी -

  • 1000 सीसीपेक्षा कमी क्षमतेही छोटी कार - थर्ड पार्टी विम्यामध्ये 12 टक्क्यांची वाढ. आता या विम्यासाठी सध्याच्या 1850 रुपयांऐवजी 2072 रुपये मोजावे लागतील.
  • 1000 ते दीड हजार सीसीच्या वाहनांसाठीचा विमा हप्ता 12.5 टक्क्याने वाढून 3221 रुपयांवर पोहोचला आहे.
  • दीड हजार सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या कारसाठीच्या थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दीड हजार सीसींपेक्षा अधिक क्षमतेच्या कारच्या थर्ड पार्टी विम्यासाठी सध्या 7890 रुपये हप्ता आकारण्यात येतो. (हेही वाचा: IRDA तर्फे खाजगी वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढणार,विद्युत वाहनांसाठी विशेष सवलत)

दुचाकी –

  • दुचाकी वाहनांमध्ये 75 सीसीपेक्षा कमी - 12.88 टक्के, 482 रुपये
  • 75 ते 150 सीसी क्षमतेच्या दुचाकी – 752 रुपये
  • 150 ते 300 सीसी – 21.11 टक्क्यांच्या वाढीने, 1193 रुपये

यासह  शालेय बससाठी थर्ड पार्टी विमा हप्त्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र ई-रिक्षासाठी हप्त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. साधारण एप्रिलमध्ये गाडीच्या विम्याचे दर वाढतात. त्यामुळे गाडीचा विमा घेण्यास टाळाटाळ न करता त्वरित ते काढून घ्यावेत.