गेल्या काही वर्षांपासून भारतातील ऑटो सेक्टर कमालीचे वाढले आहे. लोकांच्या दुचाकी-चारचाकीच्या गरजा जसजश्या वाढत आहेत तस तश्या वाहन निर्मिती कंपन्या बाजारात नवनवीन मॉडेल्स घेऊन येत आहेत. याचसोबत भारतात वाहन निर्माण करणे स्वस्त असल्याने जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारतातच उत्पादन सुरु केले आहे. यामुळे अमेरिकेच्या फोर्डसह फोक्सवॅगन, ह्युंदाई यांनी त्यांच्या भारतीय प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. मात्र, या कंपन्यांच्या भारतीय बनावटीच्या कार भारतापेक्षा परदेशातच जास्त विकल्या जात आहेत. या निर्यातीमध्ये फोर्ड इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे.
फोर्ड इंडियाची भारतात बनलेली कॉम्पॅक्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) इकोस्पोर्ट कारची निर्यात सर्वाधिक आहे. 2017-18 मध्ये कंपनीने 90,599 इकोस्पोर्ट कार निर्याते केल्या आहेत. यामध्ये गेल्यावर्षी पेक्षा 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2015 मध्ये ही गाडी पाचव्या क्रमांकावर होती. त्याच वर्षी ही गाडी दक्षिण ऑफ्रिका, तैवान, जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्यात करण्यात आले. तर 2017 मध्ये या कारला अमेरिकेमध्येही निर्यात करण्यास सुरुवात झाली. आता भारतात्तून निर्यात होणाऱ्या कारमध्ये ही गाडी एक नंबरवर आहे.
जनरल मोटर्सने त्यांच्या कार भारतात विकणे बंद केले आहे. मात्र त्यांचे अनेक प्रकल्प भारतात चालू आहेत ज्यामध्ये अनेक गाड्या बनत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शेवरोले. ही गाडी भारतात जरी विकली जात नसली तरी त्याला परदेशात फार मागणी आहे. शेवरोले बीट या कारचे या वर्षी 83,140 एवढे युनिट्स विकले गेले असून, मागील वर्षी पेक्षा यामध्ये 17.53 टक्के वाढ झाली आहे.
डिझेल उत्सर्जन घोटाळ्यात अडकूनही फोक्सवॅगन जगभरात प्रचंड प्रमाणात कार विकण्यात यशस्वी झाली आहे. फोक्सवॅगनने भारतीय ग्राहकांसाठी कॉम्पॅक्ट सेदान प्रकारात वेंटो ही कार आणली होती. मात्र, ही कार भारतापेक्षा परदेशातच जास्त विकली जात आहे. मागच्या वर्षी या करचे 63,157 इतके युनिट्स विकले गेले होते तर, वर्षी कंपनीने 77,005 कार निर्यात केल्या आहेत.
मारुती सुझुकी अल्टोने भारतीय बाजारातीत आपले स्थान अजूनही टिकवून ठेवले आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ही कार प्रत्येक वर्षीच समाधानकारक व्यवसाय करत आली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही कार भारतासोबतच परदेशातही लोकप्रिय ठरत आहे. मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 70 टक्के अधिक कार्स यावर्षी निर्यात झाल्या आहेत. मारुती सुझुकीने मागच्या वर्षी 54,656 युनिट्स इतक्या कार निर्यात केल्या होत्या.