Charging Stations (Photo Credits: Twitter|Autocar Professional)

टाटा ग्रुपच्या दोन महत्वाच्या कंपन्या टाटा पॉवर (Tata Power) आणि टाटा मोटर्सने (Tata Motors), वित्तीय वर्ष 2020 अखेर मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद या प्रमुख पाच शहरांमध्ये फास्ट चार्जिंग स्टेशन (Fast-Charging Stations) स्थापित करण्यासाठी आपली भागीदारी जाहीर केली आहे. शहरातील ई-मोबिलिटी ड्राइव्ह (E-Mobility Drive) सक्षम करण्यासाठी आज दोन्ही कंपन्यांनी पुण्यातील पहिल्या सात चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. पुढील दोन महिन्यांत अन्य चार शहरांमध्ये आणखी 45 चार्जिंग स्टेशन्स स्थापित केले जातील.

हे चार्जर टाटा मोटर्स डीलरशिप, टाटा ग्रुपच्या काही किरकोळ दुकानात आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्थापित केले जातील. हे चार्जर्स टाटा पॉवरद्वारे चालविले जाणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊन असेही चार्जिंग स्टेशन देखील असतील, जी 30-50 किलोवॅट डीसी सीसीएस 2 मानकांचे पालन करतील. वरील चार्जिंगच्या मानकांशी सुसंगत कार असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्याद्वारे या चार्जर्सचा वापर केला जाऊ शकतो. टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सने त्यांच्या ईव्ही ग्राहकांसाठी एकत्रितपणे आकर्षक चार्जिंग टेरिफ विकसित केले आहे.

टाटा पॉवरचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीर सिन्हा (Praveer Sinha) यांच्या म्हणण्यानुसार, ‘आमचे उद्दीष्ट म्हणजे सर्व भारतीयांसाठी ईव्ही चार्जर शक्य तितक्या वेगवानरित्या आणि सुलभ करणे हे आहे. यासाठी टाटा मोटर्सशी भागीदारी करण्याचा आम्हाला आनंद झाला आहे’. अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर म्हणून कंपनी आजपासून, लागू असलेल्या टाटा ईव्ही ग्राहकांना 3 महिन्यांसाठी विनामूल्य  चार्प्रजिंग सुविधा प्रदान करणार आहे.

टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक उर्जा कंपनी आहे. सध्या मुंबईत 42 इन्फ्रास्ट्रक्चर चार्जिंग पॉईंट्स आहेत. याधीही टाटा मोटर्सने महाराष्ट्र सरकारशी सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनची स्थापना करून ई-मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याच्या, दृष्टीकोनास समर्थन देण्यासाठी भागीदारी केली होती.