
लॉक डाऊन (Lockdown) मध्ये महिंद्राची वाहने घरी बसून विकत घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने शुक्रवारी एक ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म सुरू केला. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला हे व्यासपीठ ग्राहकांना वाहन खरेदीचा पूर्ण अनुभव प्रदान करेल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'ओन-ऑनलाईन' (Own-Online) या नवीन उपक्रमांतर्गत कार कर्जे, विमा, नवीन कार, कार उपकरणे आणि जुन्या कार खरेदीसंदर्भात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.
अशाप्रकारे ग्राहक चार सोप्या स्टेप्सद्वारे घरी बसून कार खरेदीचा आनंद घेऊ शकणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नकरा म्हणाले की, ‘कार खरेदी करण्यापूर्वी आणि नंतरच्या प्रक्रियेसाठी कंपनी आधीपासूनच ऑनलाइन माहिती देत आहे. परंतु आता त्यासंदर्भातील इतर सुविधाही ऑनलाइन केल्या गेल्या आहेत.’ आजकाल सर्व प्रकारात ऑनलाइन कार खरेदी करण्यास जास्त पसंती देण्यात आली आहे. त्यानुसार, महिंद्र कंपनी या वाहनांच्या किरकोळ बाजारात होत असलेल्या बदलांसाठी सज्ज आहे. (हेही वाचा: Coronavirus Effect: लॉकडाउन मुळे मारुति सुझुकी ला मोठा तोटा; एप्रिल महिन्यात एकाही गाडीची विक्री नाही)
कंपनीने आपल्या या नव्या अभियानामध्ये देशभरात 270 हून अधिक डीलर्स आणि 900 हून अधिक विक्री केंद्रे समाविष्ट केली आहेत. सर्व डीलर कमीत कमी मानवी संपर्क ठेवण्यासह, स्वच्छतेचे नियमही काटेकोरपणे पाळत आहेत. टेस्ट ड्राइव्हस्, कागदपत्रांचे संग्रहण आणि वाहन वितरण यामध्येही स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, जुन्या कारची देवाणघेवाण करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना, त्यांच्या जुन्या कारचे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने इन्स्टंट, रिअल-टाइम ऑनलाइन कोटेशन देण्यात आले आहे. अशा प्रकारे महिंद्र ऑनलाईन आपल्या गाड्या विकण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, याआधी देशातील प्रीमियम कारची आघाडीची कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) नेही ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू केली आहे.