मंत्री नितीन गडकरींची Elon Musk यांना ऑफर; फक्त 'याच' अटीवर Tesla ला मिळणार भारतामध्ये एन्ट्री (Watch Video)
Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) सध्या खूप चर्चेत आहेत. टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सच्या मालकाने सोमवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरसोबत करार केला आहे. यानंतर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा एलॉन मस्कला भारतात टेस्ला कारचे उत्पादन करण्याची ऑफर दिली आहे. गडकरी म्हणाले की, जर एलोन मस्क भारतात त्यांच्या गाड्यांचे उत्पादन करण्यास तयार असतील तर आमच्याकडे सर्व प्रकारची प्रतिभा आणि तंत्रज्ञान आहे.

गडकरी पुढे म्हणाले की, एलॉन मस्कचे भारतात स्वागत आहे आणि आम्ही त्यांना भारतात त्यांच्या गाड्या उत्पादन करण्याची विनंती करतो. परंतु मस्क चीनमध्ये त्यांच्या गाड्या तयार करून त्या फक्त भारतात विकणार असतील, तर ती चांगली गोष्ट नाही.

एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्री म्हणाले, 'मी मस्क यांना भारतात येऊन उत्पादन सुरू करण्याची विनंती करतो. आमच्याकडे भरपूर क्षमता आणि तंत्रज्ञान आहे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. येथे बंदरे आणि विमानतळ उपलब्ध आहेत. तुम्ही येथून निर्यात देखील करू शकता. पण जर मस्कला ती वस्तू चीनमध्ये बनवून फक्त भारतात विकायची असेल, तर ती चांगली गोष्ट ठरणार नाही. आमची विनंती आहे की तुम्ही भारतात या आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करा.’ (हेही वाचा: इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून शहरभरत फिरवली; कंपनीने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने ग्राहकाचे अनोखे आंदोलन (Watch Video)

एलॉन मस्क यांना त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतीय बाजारपेठेत घेऊन येण्याची इच्छा आहे, परंतु ते प्रथम गाड्याच्या करात सूट देण्याची मागणी करत आहेत. टेस्लाला भारतात आयात केलेल्या कार विकायच्या आहेत, भारताने इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी करावे, असे टेस्लाने अनेकदा सांगितले आहे. मात्र भारत सरकार यासाठी तयार नाही. भारत सरकारचे म्हणणे आहे की टेस्लाने प्रथम भारतात यावे आणि येथे कार बनवाव्यात त्यानंतरच कोणत्याही सूटचा विचार केला जाईल.