#MeTooने भारतासह जगभरातील नामवंत अभिनेते, पत्रकार, साहित्यीक आणि काही प्रमाणात राजकीय वर्तुळातही चांगलीच खळबळ उडवली. या मोहीमेचे पडसाद आता ऑटो इंडस्ट्रीतही उमटू पाहात आहेत. त्यामुळे अनेकांच्या हृदयाचे इंजिन चांगलेच धडधडू लागले आहे. ऑटो इंडस्ट्रीचा बहुतांश कारभार हा कॉर्पोरेट पद्धतीने चालतो. कॉर्पोरेट क्षेत्रातही महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना #MeTooमुळे पुढे येत आहेत. ऑटो इंडिस्ट्रीत टाटा मोटर्सचे चीफ कम्युनिकेशन ऑफिसर सुरेश रंगराजन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रंगराजन यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा स्क्रनशॉट सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे रंगराजन यांना लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे लागत आहे. रंगराजन यांनी महिला कर्मचाऱ्याविरोध गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. मात्र, या आरोपाची अद्याप चौकशी सुरु झाली नाही.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला टाटा मोटर्सने ट्वीट केले आहे की, 'टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. खास करुन महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि कामाच्या ठिकाणी त्यांना अनुकूल वातावरण राहिल याकडे लक्ष दिले जाते. कोणत्याही तक्रारीची सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल. आमची चौकशी समिती या प्रकरणाचा अभ्यास करते आहे. पूर्ण चौकशी झाल्यावर जी व्यक्ती दोषी आढळेल तिच्यावर कडक कारवाई केली जाईल.'
Allegations are being investigated and an appropriate action will be taken immediately as soon as the enquiry is complete - Tata Motors’ HR pic.twitter.com/Y7qRi1lT3q
— Tata Motors (@TataMotors) October 11, 2018
दरम्यान, कंपनीकडून असेही सांगण्यात आले आहे की, प्रकरणाची चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी म्हणून सुरेश रंगराजन यांना काही दिवस सुट्टीवर जाण्यास सांगण्यात आले आहे.