Maruti Suzuki Alto: मारुती सुझुकीच्या ऑल्टोचा नवीन विक्रम; सलग 16 वर्षे ठरली भारतामधील सर्वाधिक विकली जाणारी कार
Maruti Alto K10 (Photo Credits: Maruti Suzuki)

कोरोना व्हायरस लॉक डाऊनच्या (Coronavirus) काळात एकीकडे ऑटो इंडस्ट्रीला (Auto Industry) ग्रहण लागले आहे, दुसरीकडे मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) एक विक्रम प्रस्थापित केला आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या पत्रकार निवेदनात मारुती सुझुकीने सांगितले की, सलग 16 वर्षे, मारुती सुझुकी ऑल्टो (Maruti Suzuki Alto) ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार (India's Best-Selling Car) ठरली आहे. प्रथमच कार खरेदीदारांसाठी ऑल्टो हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. त्याचे मायलेज आणि इतर वैशिष्ट्यांसोबतच ती एक परवडणारी गाडी असल्याने ग्राहकांची पसंती या गाडीला लाभत आहे. 2019-20 मध्ये कंपनीने ऑल्टोच्या 1.48 लाख युनिट्सची विक्री केली आहे.

मारुती सुझुकीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर 2000 मध्ये लाँच झाल्यापासून, ऑल्टो कार 2004 मध्ये प्रथमच भारतातील सर्वाधिक विक्री करणारी कार ठरली होती. त्यानंतर आता गेली सलग 16 वर्षे हा विक्रम ऑल्टोने आपल्या नावावर ठेवला आहे. मारुतीने यावर्षी जानेवारीत ऑल्टोचे एक नवीन सीएनजी मॉडेल लॉन्च केले. दिल्लीतील बीएस-6 अल्टो एस-सीएनजीची (Alto S-CNG) एक्स-शोरूम किंमत 4.33 लाख रुपये आहे. मारुती सुझुकी अल्टो बीएस 6 एस-सीएनजी (Maruti Suzuki Alto BS6 S-CNG) ड्युअल इंटरपेंडेंडेंट ईसीयू आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टम देते. ही कार एलएक्सआय आणि एलएक्सआय (O) रूपांमध्ये उपलब्ध आहे आणि एक किलो सीएनजीमध्ये 31.59 किमीचे मायलेज देते. (हेही वाचा: Coronavirus: लक्झरी वाहन निर्माता कंपनी Mercedes-Benz चा मोठा निर्णय; पुण्यात 1,500 बेड्सचे रुग्णालय बांधण्याची घोषणा)

मारुति सुजुकी इंडिया (मार्केटिंग अँड सेल्स) चे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, ऑल्टोचा मजबूत कस्टमर बेस हे, या ब्रँडमधील वेळेवर होत असलेले अपग्रेड आणि रीफ्रेशमेंटचे कौतुक करणाऱ्या ग्राहकांचा पुरस्कार आहे. मारुती सुझुकीने ग्राहकांच्या आवडीनिवडींवर लक्ष ठेवले आहे आणि त्यानुसार वेळोवेळी उत्पादनात बदल केले आहेत. नवीन नियम लक्षात घेऊन सध्याच्या नवीन ऑल्टोमध्ये सर्व मानक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. यात ड्रायव्हर-साइड एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि हाय स्पीड अलर्ट सिस्टम समाविष्ट आहे.