दिवाळीच्या उत्सवाच्या काळात सोने, कपडे यांसह वाहन खरेदीलाही प्राधान्य दिले जाते. कोरोनाची परिस्थिती असूनही लोक गाडी खरेदी करण्यामध्ये रस दाखवत आहेत. अशात देशातील सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki) आपली मल्टी पर्पज सेगमेंटमधील गाडी Eeco चे 40,453 युनिट परत मागवत आहे. गुरुवारी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. मारुती सुझुकी इकोच्या हेडलॅम्प्समधील काही तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केवळ 4 फेब्रुवारी 2019 ते 25 फेब्रुवारी 2020 या कालावधीत उत्पादित युनिट परत मागवली जात आहेत.
मारुतीने सांगितले की, ते सर्व युनिट्स तपासून पाहतील आणि गाड्यांच्या हेडलॅम्प्समध्ये काही दोष आहे का ते पाहून, कोणताही दोष आढळल्यास, कंपनी हे दुरुस्त करून देईल. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. मारुती सुझुकीचे अधिकृत विक्रेते या सर्व वाहनांच्या मालकांना रिकॉलबद्दल सांगतील. कोणताही ग्राहक स्वत: याविषयी तपासून त्यांची ईको गाडी रिकॉलमध्ये आहे की नाही ते तपासून पाहू शकतील.
यासाठी ग्राहकांना मारुतीची वेबसाइट www.marutisuzuki.com वर जावे लागेल. इथे ‘Imp Customer Info; सेक्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्या वाहनाविषयी काही माहिती भरावी लागेल, जसे की वाहनाचा चेसिस नंबर (MA3 त्यानंतर 14 अंकी अल्फा संख्या क्रमांक). आपल्या आरसीवर वाहनाचा चेसिस नंबर लिहिलेला असतो. ही माहिती भरल्यावर तुम्हाला समजेल की तुमची गाडी रिकॉलमध्ये आहे की नाही. (हेही वाचा: 2020 Hyundai i20 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स)
दरम्यान, कार विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने देशांतर्गत बाजारात 1,66,825 वाहने विकली आहेत, जी आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री आहे. याशिवाय ऑक्टोबरमध्ये 9,586 वाहनांची निर्यातही झाली.