त्वरा करा: महिंद्रा आणि मारुतीच्या या गाड्यांवर भरघोस सवलत; Ciaz वर तर 1 लाखापर्यंत सूट
Mahindra TUV300 Plus (Photo Credits: Twitter)

ग्राहकांच्या चारचाकीच्या वाढत असलेल्या गरजा पाहून, अनेक कार निर्मात्या कंपन्या बाजारात विविध पर्याय घेऊन येत आहेत. मात्र 2018 मध्ये गाड्यांची अपेक्षेपेक्षा फार कमी विक्री झाली. यामुळे 2019 च्या दुसऱ्या महिन्यापर्यंतही हा जुना स्टॉक तसाच पडून आहे. हा स्टॉक बाहेर काढण्यासाठी आता या कंपन्या अशा गाड्यांवर भरघोस सूट देत आहेत. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या प्रीमियम डिलरशीप नेक्साच्या कारवर शानदार ऑफर देत आहे. सोबतच महिंद्रा (Mahindra) कंपनीनेही आपल्या एसयुव्ही, एमपीव्ही आणि हॅचबॅक गाड्यांवर सवलत जाहीर केली आहे. चला पाहूया कोणत्या आहेत या गाड्या

> महिंद्रा माराझो (Mahindra Marazzo) - महिंद्रा माराझो ही गाडी कंपनीने मागच्या वर्षी बाजारात आणली होती. या गाडीची किंमत साडेनऊ लाखांपासून सुरु होते. उत्तम मायलेज देणारी गाडी म्हणून ही ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती. आता या गाडीवर कंपनी 20,000 रुपयांची सूट देत आहे.

> मारुती इग्निस (Maruti Ignis) - इग्निसच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटवर 85,000 आणि मॅन्युअल व्हेरिअंटवर 75,000 रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. मारुती इग्निसमध्ये 1.2-लिटरचे पेट्रोल इंजिन आहे, हे इंजिन 83hp पावर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते.

> महिंद्रा TUV300 – ही गाडीदेखील साधारण साडेनऊ लाखांपासून सुरु होत आहे. कंपनीने या गाडीवर 75 हजाराची सवलत जाहीर केली आहे. (हेही वाचा : भारतातील पहिली Cadillac Escalade मराठी माणसाच्या दारी)

> मारुती एस-क्रॉस (Maruti S Cross) – चार व्हेरिएंट आणि पाच रंगांमध्ये उपलब्ध असणारी मारुती कंपनीची ही एक महत्वाची गाडी. या कारवर 95 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 75 हजार रुपयांपर्यंत कॅश आणि कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.

> महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) – महिंद्रा कंपनीची सर्वात लोकप्रिय कार म्हणून या गाडीकडे पाहिले जाते. कंपनी 2018 च्या गाडीवर 85,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. S5, S7 आणि S11 या प्रकारांवर ही सवलत दिली जात आहे.

> मारुती सियाझ (Maruti Ciaz) – मारुतीच्या या प्रीमियम गाडीवर 1 लाखापर्यंतची सवलत मिळू शकते. यामध्ये 25 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि कॅश व कॉर्पोरेट डिस्काउंटचाही समावेश आहे. या गाडीची मूळ किंमत 8.20 लाखापासून सुरु होत आहे.