किक आणि सेल्फ स्टार्ट खराब झाल्यास बाईक स्टार्ट कशी कराल ?
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

अचानक बाईक स्टार्ट न होण्याचा अनुभव तुम्हालाही आलाय का? याचे कारण म्हणजे किक खराब होणे किंवा बॅटरी डिस्चार्ज होणे, हे असते. अशावेळी बाईक पुन्हा सुरु करताना नाकी नऊ येतात. या प्रसंगात तुमच्या मदतीला दुसरं कोणी नसेल तर मात्र काम अवघडच होऊन बसते.

काही बाईकला किक नाही. पण पॉवरफुल बॅटरी असते. पण काही कालांतराने बॅटरी कमजोर होते आणि सेल्फ स्टार्टला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्हाला अशा काही ट्रिक्स माहित असणे गरजेचे आहे ज्यामुळे बाईक स्टार्ट होण्यास मदत होईल.

# तुम्ही बाईक धक्का मारुनही स्टार्ट करु शकता. पण त्यासाठी तुमच्या सोबतीला कोणीतरी असणं गरजेचं आहे. एकजण बाईक नियंत्रित करेल तर दुसरा तिला धक्का मारेल. हे काम तुम्ही बाईकचा क्लच दाबूनही करु शकता. पण हे थोडे रिस्की असते. तुम्ही धक्का न मारताही बाईक स्टार्ट करु शकता.

# सर्वप्रथम बाईकला चावी लावून इंजिन ऑन करा. बाईकला टॉप गिअरमध्ये टाका. तुमच्या बाईकला चार गिअर असतील तर तिला चौथ्या गिअरमध्ये आणा. जर पाच असतील तर पाचव्या गिअरवर आणा. टॉप गिअरमध्ये टाकल्यानंतर बाईकच्या मागच्या चाकाला वरच्या दिशेने फिरवा.

# जर चाक वरच्या दिशेने फिरत नसल्यास ते थोडे मागे पुढे करुन फ्री करा. हे तुम्हाला अगदी सहज जमेल. व्हील फ्री झाल्यावर त्याला वरच्या दिशेने फिरवा. एक किंवा दोन वेळा केल्यास बाईक स्टार्ट होत नाही पण इंजिन स्टार्ट होते. बाईकचे इंजिन स्टार्ट झाल्यानंतर एक्सिलेटरच्या मदतीने तुम्ही बाईक नियंत्रित करु शकता.