अॅक्टीव्हाने तोडले सर्व रेकॉर्ड्स ; 2 कोटी स्कूटर्सची विक्रमी विक्री
अॅक्टीव्हा (Photo Credit: Twitter)

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर प्रा. लि. ने 2 कोटींहून अधिक स्कूटर्सची विक्री झाल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने सांगितले की, "दोन कोटीहून अधिक स्कूटर्सची विक्री होणारी ही भारतातील पहिली स्कूटर आहे."

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनोरु काटो यांनी सांगितले की, "आज 2 कोटीहून अधिक ग्राहक अॅक्टीव्हा परिवारात सहभागी झाले. अॅक्टीव्हा अनेक लोकांच्या पसंतीस उतरत आहे. अशावेळी आम्ही ग्राहकांना समाधानकारक सुविधा देण्यासाठी अधिक तत्पर आहोत."

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 1 कोटी अॅक्टिव्हा स्कूटर विकण्यासाठी 15 वर्ष लागली. पण अलिकडेच 3 वर्षाच्या आत कंपनीने आणखी एक कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. विक्रीचा दर मागील एक कोटीच्या तुलनेत चारपट अधिक आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले की, "भारतात 2001 मध्ये अॅक्टीव्हा लॉन्च केल्यानंतर भारतीय ऑटोमेटीक स्कूटरने मार्केटमधील परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली आणि भारतात दुचाकी रायडिंगला नवे वळण दिले." तसंच गेल्या 18 वर्षात ग्राहकांच्या 5 पिढ्यांनी अॅक्टीव्हावर विश्वास ठेवल्याने त्यांनी यावेळी ग्राहकांचे आभारही मानले.