Formula E Race: हैदराबाद येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणार जगप्रसिद्ध फॉर्म्युला ई रेसचे आयोजन
Press conference of 'ABB FIA Formula E Championship Seoul E-Prix 2020' in Seoul. (Photo credit: NEWSIS)

भारतातील फॉर्म्युला वन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फॉर्म्युला ई-रेस (Formula E Race) पुढील वर्षी 11 फेब्रुवारी रोजी भारतात आयोजित केली जाईल. एफआयए वर्ल्ड मोटर स्पोर्ट कौन्सिलने फॉर्म्युला ई चॅम्पियनशिपच्या नवव्या हंगामाचे कॅलेंडर प्रसिद्ध केले असून, हैदराबादने या रेसचे आयोजन करण्याची पुष्टी केली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये, तेलंगणा सरकारने फॉर्म्युला ई आयोजित करण्यासाठी संस्थेच्या अधिकार्‍यांसह आशय पत्रावर स्वाक्षरी केली होती

2011 ते 2013 या कालावधीत बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन केल्यानंतर भारतात होणारी ही दुसरी सर्वात मोठी ग्लोबल वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा असेल. Alberto Longo, फॉर्म्युला ई चे सह-संस्थापक आणि मुख्य चॅम्पियनशिप अधिकारी म्हणाले, ‘ABB FIA फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप सीझन 9 कॅलेंडर हे आमचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात डायनॅमिक रेसिंग शेड्यूल आहे. ते सुरू होण्याची मला प्रतीक्षा आहे. पुढील हंगामात जुलै 2023 पर्यंत 18 रेसेस पाहण्याची संधी असेल.’

फॉर्म्युला ई-रेस ही इलेक्ट्रिक-पॉवर्ड सिंगल-सीटर चॅम्पियनशिप आहे, जी 2014 मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर 2020-21 च्या हंगामापासून FIA ने त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिपचा दर्जा दिला. 2014-15 मध्ये चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून भारताची महिंद्रा ही रेसिंग फॉर्म्युला E चा भाग आहे. सुरुवातीच्या मोसमात सहभागी झालेला करुण चंडोक हा एकमेव भारतीय ड्रायव्हर आहे. (हेही वाचा: Upcoming Cars: महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्हीचे भारतात अनावरण, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)

या वर्षाच्या सुरुवातीला, फॉर्म्युला ई ने पुढील सिझनसाठी नवीन कारचे अनावरण केले. फॉर्म्युला ई-रेसला बर्‍याचदा 'ई-प्रिक्स' असे संबोधले जाते. ही शर्यत जगातील काही मोठ्या शहरांच्या रस्त्यावर आयोजित केली जाते. फॉर्म्युला ई-रेस ही शर्यत प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि ती इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी काम करते.