ट्रॅक्टर (Tractor) उत्पादक सोनालिकाने (Sonalika) भारतातील पहिला शेतीसाठी फार्म-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Farm-Ready Electric Tractor) बाजारात आणला आहे. या ट्रॅक्टरला 'टाइगर इलेक्ट्रिक' (Tiger Electric) असे नाव देण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर जर्मनीमध्ये डिझाईन केला गेला आहे आणि भारतात त्याची निर्मिती झाली आहे. कंपनीने टायगर इलेक्ट्रिकचे बुकिंगही सुरू केले आहे. टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक IP67 कंप्लायंट 25.5 किलोवॅट नैसर्गिक कूलिंग कॉम्पॅक्ट बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे यामुळे ट्रॅक्टरची रनिंग कॉस्ट डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत एक चतुर्थांश होते. सोनालिका टायगरची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, हा ई-ट्रॅक्टर जास्तीत जास्त 24.93 किमी प्रतितास वेगाने धावू शकेल. हा ट्रॅक्टर दोन टन ट्रॉलीसह धावताना आठ तासांची बॅटरी बॅकअप देऊ शकतो. सोनालिका या ट्रॅक्टरसोबत एक फास्ट चार्जिंग सिस्टम ऑफर करीत आहे, ज्याच्या मदतीने फक्त चार तासात हा ट्रॅक्टर चार्ज होऊ शकतो. टायगर इलेक्ट्रिकमधून भारतीय शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे नफ्यातही वाढ होणार असल्याचे सोनालिका समूहाचे कार्यकारी संचालक रमण मित्तल यांनी सांगितले. ते म्हणाले की, टायगर इलेक्ट्रिककडे तेच जागतिक तंत्रज्ञान आहे जे युरोपियन आणि अमेरिकन शेतकऱ्यांकडे आहे.
मित्तल पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या बाबतीत सतत नवनवीन उपक्रम सादर करण्याचे आमचे प्रत्येक शेतकर्याला वचन आहे, जेणेकरुन शेती व नफ्यात सुधारणा होईल. 2030 पर्यंत भारतात विद्युत वाहने सादर करण्याच्या भारत सरकारच्या उद्दीष्टामध्येही टायगर एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. (हेही वाचा: स्मार्टफोननंतर ऑटो क्षेत्रात 'ॲपल' कंपनीची उडी; घेऊन येत आहे इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या काय असेल खास)
हा ट्रॅक्टर पंजाबच्या होशियारपूरमध्ये सोनालिकाच्या इंटिग्रेटेड ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलीटीमध्ये तयार केला आहे. शेतकऱ्यांना हा टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरणे सोपे ठरणार आहे. हा ट्रॅक्टर नियमित ट्रॅक्टरपेक्षा जास्त वेगळा नाही, मात्र यामुळे नक्कीच इंधनाचा खर्च कमी होणार आहे.