Maruti Suzuki (Photo Credits-Twitter)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) काही तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 1 लाख 80 हजारांहून अधिक कार परत मागवणार (Car Recall) आहे. या रिकॉलमध्ये कंपनीच्या Ciaz, Ertiga, Vitara Brezza, S-cross आणि XL6 प्रकारांचा समावेश आहे. मारुती सुझुकीच्या मते, ज्या कार 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 दरम्यान तयार केल्या गेल्या आहेत, त्या परत मागवल्या जातील आणि दुरुस्त केल्या जातील. त्यानंतर त्या ग्राहकांना परत केल्या जातील. मारुती सुझुकीच्या मते, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, कंपनी नोव्हेंबरपासून या गाड्या परत मागवण्याची प्रक्रिया सुरू करेल.

या अंतर्गत, वाहनांचे मोटर जनरेटर युनिट तपासले जाईल आणि काही दोष आढळल्यास ते बदलले जाईल. याची माहिती मारुतीच्या अधिकृत वर्कशॉपमधून वाहनांच्या मालकांना दिली जाईल. जर वाहनाच्या या भागात काही दोष आढळला तर नोव्हेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यापासून ते दुरुस्त करण्याचे काम सुरू होईल. यापूर्वी, नोव्हेंबर 2020 मध्ये, हेडलाइट्समध्ये बिघाड झाल्यामुळे मारुती सुझुकीने आपल्या इको वाहनांचे 40 हजारांहून अधिक युनिट्स परत मागवले होते. जुलै 2020 मध्ये कंपनीने इंधन पंपच्या समस्येमुळे वॅगनआर आणि बलेनोच्या सुमारे 1 लाख 34 हजार युनिट्स परत मागवल्या आहेत.

गाड्यांमध्ये काही दोष आढळल्यास आता कंपन्या स्वतः पुढाकार घेतात आणि कार परत मागवतात व सदोष भाग स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करतात. यामुळे कंपनीची विश्वासार्हता मजबूत होते. ब्रँड बाजारात मजबून होण्यास मदत होते. 2020 मध्ये मारुती सुझुकीने 3,80,615 कार परत मागवल्या आहेत. आतापर्यंत, कंपनीने आपल्या कारच्या 5 लाखांहून अधिक युनिट्स परत मागवल्या आहेत.

दरम्यान, नुकतेच लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा लॅटिन एनसीएपीने (Latin NCAP) सुझुकी स्विफ्टची क्रॅश-चाचणी केली. यामध्ये स्विफ्टला सुरक्षा वॉचडॉगकडून शून्य-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. कारला अडल्ट ऑक्यूपंट प्रोटेक्शन 15.53 टक्के रेटिंग मिळाली आहे, तर त्याला मुलांच्या ऑक्यूपंट प्रोटेक्शनसाठी 0 टक्के रेटिंग मिळाली आहे.