Elon Musk ला मोठा झटका; Tesla च्या गाड्यांमध्ये आढळल्या त्रुटी, 1,58,000 गाड्या परत मागवण्याचे आदेश
Tesla (Photo Credit: Getty Images)

अमेरिकेच्या (NHTSA) नियामकांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कची (Elon Musk) कंपनी टेस्लाला (Tesla) त्यांच्या 158,000 मोटारी परत मागवण्याचे (Recall) आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या त्रुटींमुळे कंपनीला या गाड्या परत बोलण्यास सांगण्यात आले आहे. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने टेस्लाला पाठवलेल्या पत्रात, कंपनीच्या गाड्यांच्या डिस्प्ले स्क्रीनमध्ये काही समस्या असल्याचे म्हटले आहे. कंपनीसाठी ही फार मोठी गोष्ट आहे, कारण पहिल्यांदाच टेस्लाच्या इतक्या जास्त प्रमाणात गाड्या रिकॉल केल्या जात आहेत. नियामकांनी टेस्लाला सर्व कार मालकांना, खरेदीदारांना आणि डीलर्सला या समस्येबद्दल आणि ती लवकरच सोडवण्याबद्दल सांगितले आहे.

एजन्सीचे म्हणणे आहे की 2012-2018 दरम्यान तयार केलेली टेस्ला मॉडेल एस कार आणि 2016-2018 दरम्यान तयार केलेल्या मॉडेल एक्सएस कार सदोष असल्याचे आढळले आहे. निर्माण झालेल्या समस्येबाबत सर्वाना सांगण्यास टेस्ला बांधील नाही, मात्र याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांच्याकडे 27 जानेवारीपर्यंतची मुदत आहे. जर टेस्ला वाहने परत घेण्यास सहमत नसेल, तर त्यांना एजन्सीला त्यांच्या निर्णयाची पूर्ण माहिती द्यावी लागेल. एनएचटीएसए एजन्सीचे म्हणणे आहे की टचस्क्रीन फेल्युअरमुळे सुरक्षिततेच्या अनेक समस्या उद्भवू लागळ्या आहेत, ज्यामध्ये रिअर व्ह्यू/बॅकअप कॅमेरा इमेजला नुकसान होत आहे.

एनएचटीएसएने सांगितले की, टेस्लाने आपल्या वाहनांमध्ये काही समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने आपल्या वाहनांमध्ये अनेक ओव्हर-द-एयर अपडेट लागू केले आहेत. परंतु एजन्सीनुसार ही अपडेट्स पुरेसी नाहीत व कंपनीला वाहनांशी संबंधित अपडेट्सवर अजून काम केले पाहिजे. (हेही वाचा: अखेर Elon Musk यांची इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनी Tesla ची भारतामध्ये एन्ट्री; बेंगळुरू येथे थाटले कार्यालय, तीन संचालकांची नावे जाहीर)

दरम्यान, मागील वर्षी कंपनीने 5 लाख मोटारींची विक्री केली. अलिकडच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि त्याची बाजारपेठ 800 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. टेस्ला ही जगातील सर्वात मूल्यवान वाहन कंपनी आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे इलोन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहते.