मारुती सुझुकी च्या Alto ने रचला इतिहास; 38 लाख कार्सच्या विक्रीसह बनली देशातील सर्वात लोकप्रिय गाडी
नवीन अल्टो (Photo Credit : Twitter)

आर्थिक मंदीचा सामना करत असलेलेली देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी, मारुती सुझुकीसाठी (Maruti Suzuki) एक आनंदाची बातमी आहे. मारुती सुझुकीची छोटी कार ऑल्टोने (Alto) तब्बल 38 लाखांच्या विक्रीचा आकडा पार केला आहे. मारुतीने जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. यावरून सध्या बाजारात या गाडीचा दबदबा असलेला दिसून येत आहे. ऑल्टोने 2008 मध्ये 10 लाख विक्रीचा आकडा ओलांडला होता. त्यानंतर 2012 मध्ये 20 लाख कार विकल्या गेल्या. पुढे 2016 मध्ये 30 लाख कार विकल्या गेल्या.

कंपनीने ही कार 2000 मध्ये बाजारात आणली होती. मारुती अल्टो सलग 15 वर्षे भारतामधील सर्वाधिक विक्री करणारी कार ठरली आहे. एमएसआयचे कार्यकारी संचालक (विपणन व विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले, ‘उत्तम डिझाइन, सुलभ ऑपरेशन, उच्च इंधन कार्यक्षमता, प्रगत सुरक्षा उपाय आणि सुलभ देखभाल यामुळे अल्टो अजूनही पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची पहिली पसंती आहे.’ अल्टो 800 ची इंधन कार्यक्षमता प्रति लीटर 22.05 किलोमीटर आहे. यात एअर बॅग, लॉक अँड ब्रेकिंग सिस्टम आणि अ‍ॅडव्हान्स ब्रेक सिस्टम (एबीएस) तसेच रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड वॉर्निंग सिस्टम आणि ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर दोघांसाठी सीट बेल्ट वॉर्निंग सिस्टमसह सर्व वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. (हेही वाचा: आर्थिक मंदीचा मारुती सुझुकी कंपनीला मोठा फटका, सलग आठव्या महिन्यातही उत्पादन कपात)

मारुती अल्टोचे आपल्याला पेट्रोलसह  सीएनजी व्हेरिएंट देखील मिळते. दिल्लीतील या कारची एक्स-शोरूम किंमत 2.89 lakh लाख ते 4.09 लाख रुपयांदरम्यान आहे. मारुतीने अल्टो यावर्षी बीएस 6 मानकांसह नवे मॉडेल सादर केले आहे, ज्यामध्ये इंधन कार्यक्षमता 22.05 किलोमीटर आहे. दरम्यान, मागणीअभावी मारुती सुझुकीने ऑक्टोबर महिन्यात सलग 9 व्या महिन्यात आपल्या प्रवासी वाहनाचे उत्पादन कमी केले आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीने एकूण 1,19,337 वाहने तयार केली, जी मागील वर्षी याच महिन्यात 1,50,497 वाहने होती.