अल्झारी जोसेफ (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) आगामी लिलाव सर्व संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आयपीएलच्या (IPL) रिटेन्शन नियमामुळे गेली अनेक वर्षे एकाच संघातून खेळणारे अनेक खेळाडूंना लिलावात उतरवणे भाग पाडले आहे. त्यामुळे आता हे सर्व खेळाडू लिलावात उतरणार आहेत. अशा परीस्थितीत काही खेळाडूंचे नशीब चमकणार आहे, तर अनेक खेळाडूंना नव्या संघात सामील होण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलचा लिलाव (IPL Auction)  12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. यापूर्वी भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात असून पाहुण्या संघातील अनेक खेळाडूंवर यादरम्यान मोठी बोली लावली जाणे अपेक्षित आहे. (MI IPL 2022 Mega Auction Plan: मुंबई इंडियन्सची ‘या’ माजी खेळाडूंवर असेल नजर, संघात समावेश करण्यासाठी करावा लागेल खिसा खाली)

आयपीएलचा लिलाव असो किंवा कोणताही नियमित सामना विंडीज खेळाडूंचा यामध्ये समावेश झाला तर त्याचा उत्साह आपोआप द्विगुणित होतो. कारण विंडीजचे खेळाडू आपल्या धमाकेदार फलंदाजी आणि आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कोणत्याही संघाला चांगले संतुलन मिळवून देतात. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत असा एक गोलंदाज आ ज्याने या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज फलंदाजांना दोनदा पॅव्हिलियनमध्ये पाठवले आहे. विंडीजच्या अल्झारी जोसेफने या मालिकेत चांगली गोलंदाजी केली असून त्याने आतापर्यंत 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याचा आयपीएल रेकॉर्डही उत्तम आहे.

आयपीएल सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम जोसेफच्या नावावर आहे. 2020 मधील आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही, परंतु अॅडम मिल्ने ऐवजी मुंबई इंडियन्सने जोसेफला आपल्या संघात समाविष्ट केले आणि त्याला सनरायझर्सविरुद्ध खेळण्याची संधी दिली. या सामन्यात त्याने आपल्या तुफानी गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. या सामन्यात त्याने एकूण 6 विकेट घेतल्या. त्यानंतर तो आणखी दोन सामने खेळला पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. जोसेफ फिटनेसच्या समस्यांशी झुंजत होता. पण आयपीएल 2022 लिलावापूर्वी जोसेफने दाखवून दिले आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि क्रिकेट तज्ञांना आशा आहे की फ्रेंचायझी त्याच्यावर मोठी बोली लावतील.