जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉय (Photo Credit: Facebook)

IPL 2021: डेविड वॉर्नरच्या (David Warner) जागी केन विल्यमसनच्या (Kane Williamson) हाती कर्णधारपदाची धुरा देण्याचा सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नुकताच आपला मोठा निर्णय जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. याबद्दल हैदराबादने ट्विटरवरुन माहिती दिली आणि म्हटले, “केन विलियम्सन उद्याच्या (2 मे) सामन्यात तसेच उर्वरित हंगामात संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल.” याचबरोबर हैदराबादने म्हटले की “हा निर्णय सोपा नव्हता. संघव्यवस्थापनाला वॉर्नरच्या कित्येक वर्षांपासून फ्रँचायझीवर असलेल्या परिणामांचा आदर आहे. आम्हाला विश्वास आहे की वॉर्नर मैदानात आणि मैदानाबाहेर उर्वरित हंगामासाठी योगदान देत राहिल.” शिवाय, संघाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) होणाऱ्या सामन्यासाठी परदेशी संयोजनात देखील बदल करण्याचं म्हण्टलं आहे. त्यामुळे आता फलंदाज म्हणून देखील वॉर्नर बाहेर पडेल असे दिसत आहे. (IPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या उर्वरित सामन्यांमध्ये Kane Williamson ला मिळाली कर्णधारपदाची जबाबदारी, डेविड वॉर्नरकडून हिसकावली कॅप्टन्सी)

दरम्यान, हैदराबादचा सलामी फलंदाज म्हणून वॉर्नरची जागा घेण्यासाठी इंग्लंडचा धाकड ओपनर जेसन रॉय (Jason Roy) सज्ज आहे. मिचेल मार्शच्या जागी बदली खेळाडू म्हणून सामील झालेला रॉय मागील 6 सामान्यांपासून सनरायझर्स हैदराबादच्या बेंचवर बसून आहे. शेवटच्या स्थानावर झेप घेण्यामागे हैदराबादचा लो स्कोअरिंग रेट हे एक प्रमुख कारण आहे आणि त्यांना रॉय सारख्या धाकड फलंदाजांची गरज आहे जो मैदानावर उतरताच वेगाने धावा करू शकेल. भारत-इंग्लंड मालिकेतील रॉयचा फॉर्म सनरायझर्सने त्याला रोखण्या मागचे मुख्य कारण होते आणि आता वॉर्नर धावा करण्यासाठी संघर्ष करत असताना त्याला संधी देण्याची आता योग्य वेळ आली आहे. रॉयने 235 टी-20 मध्ये 142.47 च्या स्ट्राईक-रेटने तब्बल 6085 धावा केल्या आहेत.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्सच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर ती पूर्णतः निराशाजनक राहिली आहे. हैदराबादने आतापर्यंत 6 सामने खेळले असून यात त्यांना एक विजय मिळाला आहे. संघात सामूहिक कामगिरीचा अभाव दिसत असल्यामुळे कर्णधार वॉर्नरने काही सामन्यांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंचा समावेश करण्याचा प्रयोग केला, परंतु त्याची रणनीती अपयशी ठरली. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधारच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नरने यंदा दोन अर्धशतकी केली पण मधल्या फळीत आणि डेथ ओव्हर्समध्ये हैदराबादच्या फलंदाज सातत्याने अपयशी ठरले. त्यामुळे आता जॉनी बेयरस्टो आणि संधी दिल्यास जेसन रॉयची जोडी काही कमाल करू शकते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.