ENG vs IND 4th Test: उमेश यादवने कबूल केले, ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने केली घोडचूक
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

ENG vs IND 4th Test: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल (The Oval) मैदानात खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या सत्रात इंग्लंडची स्थिती पाच विकेट केवळ 62 धावा अशी केली होती. तरीही संघाने अखेरच्या सत्रात 290 धावांपर्यंत मजल मारली आणि 99 धावांची आघाडी घेतली. दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) कबूल केले की टीम इंडियाने चूक केली आहे. इंग्लंडच्या लोअर-मिडल ऑर्डरने भारताविरुद्ध चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी संघासाठी आवश्यक धावा काढल्या. ओली पोपने (Ollie Pope) 81 धावा केल्या, तर क्रिस वोक्सने (Chris Woakes) अर्धशतक झळकावत यजमानांना भारतावर 99 धावांची आघाडी मिळवून दिली. भारताला यजमानांना बाद करण्यात यश आले, पण कर्णधार विराट कोहलीला आवडेल तितक्या लवकर विकेट्स आल्या नाहीत. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने दिवसाचा खेळ संपल्यावर पत्रकारांशी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना गोलंदाजी युनिटने चूक केल्याचे कबूल केले. (IND vs ENG 4th Test Day 3: तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि केएल राहुलवर मोठी जबाबदारी, भारताचे अर्धशतक पूर्ण)

“ज्या प्रकारे आम्ही आमची गोलंदाजी सुरू केली, 40 मिनिटांच्या आत आम्ही दोन विकेट्स घेतल्या, त्यानंतर आम्ही असे म्हणू शकतो की ते कमी होते, कारण आम्ही सात किंवा आठ ओव्हरमध्ये 40-45 धावा दिल्या, मग फलंदाजांची लय परतली, त्यांना काय करावे लागेल हे देखील कळले,” तो म्हणाला. यादव पुढे म्हणाला, “याचा परिणाम असा झाला की फलंदाजांनी पुनरागमन केले आणि गती मिळवू शकले. जेव्हा चेंडू स्विंग आणि स्पिन होत नव्हता, तेव्हा आम्ही पाहिले की इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. आम्ही चुकाही केल्या ज्यामुळे गोष्टी आणखी वाईट झाल्या. दोन विकेट गमावल्यानंतर त्यांनी मधल्या गेममध्ये बऱ्याच धावा काढल्या. तथापि, त्यानंतर भारतीय संघाने चांगले कमबॅक केले आणि गोलंदाजी कशी करायची हे माहित करून घेतले.”

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहली आणि शार्दुल ठाकूरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 52 धावांवर 5 विकेट गमावल्यानंतर 290 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून ओली पोप आणि क्रिस वोक्सने अर्धशतके केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात बिनबाद 43 धावा केल्या होत्या. आता तिसऱ्या दिवशी भारताचे लक्ष्य यजमान संघापुढे मोठे लक्ष्य देण्याचे असेल. यासाठी सलामी जोडी, रोहित शर्मा व केएल राहुल यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.