साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने शिक्षा जाहीर केली आहे. आरोपी मोहन चौहान याला दिंडोशी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मोहन चौहान याने एका महिलेवर बलात्कार केला होता. त्यानंतर पीडितेचा 11 सप्टेंबर रोजी मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.  न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले- 'हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा 10 मिनीटे इतका जलद होता. या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.'

ते पुढे म्हणाले, 'पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या कार्यतत्परतेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच याद्वारे महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलिस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश समाजात पोहोचावा ही अपेक्षा.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)