
साधारणपणे रेस्टॉरन्टमध्ये जेवून झाल्यावर वेटरला टीप देण्याची पद्धत आहे. ते तुम्ही पाहिले, अनुभवले आणि केले देखील असेल. पण टीप म्हणून कधी कोणी सात लाख रुपये दिल्याचे ऐकले किंवा पाहिले आहे का? असं तुम्हाला कोणी सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाही. पण अमेरिकेतील ग्रीनव्हिले येथे असणाऱ्या सूप डॉग्स रेस्टॉरन्टमध्ये एका महिला वेटरला चक्क सात लाख रुपये टीप म्हणून मिळाले आहेत. या महिला वेटरचे नाव आहे ऐलेना कस्टर.
कोण होता हा दिलदार मनुष्य? तर हा युट्युबवरील प्रसिद्ध ब्लॉगर जिम्मी डोनाल्डसन म्हणजे मिस्टर बीस्ट असल्याची माहिती डेली मेलने दिली आहे. याने रेस्टॉरन्टमध्ये जावून फक्त पाण्याच्या दोन बाटल्या मागवल्या आणि वेटरला लाखोंची टीप दिली. गेल्या वर्षीही जिम्मी डोनाल्डसनने एका पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्याला 10 हजार डॉलर्सची टीप दिली होती. ऐलेनाला दहा हजार डॉलर्सची टीप मिळताच ती आश्चर्यचकीत झाली. पण तिने काही रक्कम स्वतःकडे ठेवून बाकी सहकारी महिला वेटर्समध्ये वाटली.
जिम्मी डोनाल्डसन सोशल मीडियात 'मिस्टर बीस्ट' या नावाने प्रसिद्ध आहेत. युट्युबवर त्यांचे 9 मिलियनपेक्षा अधिक सबस्क्रायबर असून त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला साधारणपणे 5 मिलियन व्ह्युज मिळतात.