प्रातिनिधिक प्रतिमा (File photo)

मुंबईच्या बोरीवली स्टेशनवर (Borivali Railway Station) चोरीला गेलेला मोबाईल वाचवण्यासाठी चोरांच्या मागे धावल्याने एक तरुण चांगलाच जखमी झाला आहे. चोराच्या मागे धावताना या व्यक्तीने चक्क कोणताही विचार न करता रेल्वेच्या समोर उडी घेतली. रेल्वे अंगावर जाऊ न शकल्याने हा तरुण जिवंत राहिला. मात्र या दरम्यान चोराने यशस्वी पलायन केले आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. हे पाहून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो.

तर 16 जानेवारीला गुजरातला जाण्यासाठी काका आणि पुतण्या 6-7 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर बसले होते. ट्रेन येण्यासाठी वेळ असल्याने हे दोघेही आपापल्या फोनमध्ये दंग होते. इतक्यात त्यांच्या समोर एक काळ्या रंगाचे कपडे घातलेला तरुण आला आणि जशी प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली तसे त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेऊन, त्याने ट्रेनसमोर उडी मारली. हे पाहून पुतण्यानेदेखील त्या चोराच्या मागे उडी मारली आणि तो ट्रेनसमोर ट्रॅकवर पडला. जखमी झाला असूनही त्याने चोराला पकडून ठेवले. मात्र त्याच्या मदतीला कोणीही न आल्याने चोर निसटून गेला. सुदैव म्हणजे ही ट्रेन त्याच्या अंगावरून गेली नाही, या अपघातात तो थोडक्यात बचावला.

ट्रेन निघून गेल्यानंतर पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरील लोकांना हा तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याला इतरांनी प्लॅटफॉर्मवर उचलून आणले आणि नंतर रुग्णालयात भरती केले. तो सध्या आयसीयुमध्ये दाखल असून त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. दरम्यान बोरीवली पोलिसांनी या आरोपींना पकडले आहे. अर्शद शेख (26) आणि प्रवेश शेख (26) अशी ही या दोघांची नवे आहेत. हे दोघेही मीरा रोडचे रहिवासी आहेत.