चमत्कार: जगातील दुसरा HIV बाधित व्यक्ती झाला बरा, वाचा कसे
प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो क्रेडिट: Pixbay)

आतापर्यंत तुम्ही एचआयव्ही (HIV) म्हणजेच एड्सवर कोणताही उपाय नाही असेच ऐकले असेल. बऱ्याच संशोधनानंतरही वैज्ञानिकांना एचआयव्ही संक्रमित व्हायरसला  मारण्यासाठी औषध तयार करण्यात यश आले नाही. परंतु ब्रिटनच्या डॉक्टरांनी एका एचआयव्ही पीडित व्यक्तीला चक्क बरे केले असल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या मदतीने या व्यक्तीने चक्क एचआयव्हीवर विजय प्राप्त केला आहे. ही व्यक्ती जगातील दुसरी व्यक्ती ठरली आहे जी एचआयव्हीपासून पूर्णपणे बरी झाली आहे. ‘द टेलिग्राफ डॉट को डॉट यूके’ने दिलेल्या वृत्तानुसार तिथल्या डॉक्टरांनी अशा प्रकारचा दावा केला आहे.

या रुग्णाला एचआयव्ही व्हायरसपासून मुक्त करण्यासाठी डॉक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लँट (Bone Marrow Transplant) केला आहे. ज्या व्यक्तीने स्टेम सेल दिले आहेत त्या व्यक्तीला यूनिक जेनेटिक म्यूटिलेशन (Mutation) आहे. जे नैसर्गिक रूपाने एचआयव्ही विरूद्ध प्रतिरोधक क्षमता पुरवते आणि एचआयव्ही संक्रमण दूर करते. हे म्यूटेशन उत्तर यूरोपमध्ये राहणाऱ्या केवळ एक टक्के लोकांमध्येच आढळते. (हेही वाचा: गर्भवती महिलेला दिले HIV संक्रामित रक्त, रक्तदात्याने केली आत्महत्या)

बोन मॅरो ट्रान्सप्लँटच्या तीन वर्षानंतर आणि अँटिरेट्रोवायरल ड्रग्स बंद होण्याच्या 18 महिन्यानंतर तपासणी केली असता, या रुग्णामध्ये एचआयव्हीचे विषाणू आढळून आले नाहीत. डॉक्टरांच्या या प्रयत्नाला आलेले यश पाहता लवकरच एड्ससारखा धोकादायक रोग पूर्णपणे बरे करण्यासाठी काही औषध निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जी पहिली व्यक्ती या रोगापासून मुक्त झाली ती एक जर्मन व्यक्ती होती, त्याला ‘बर्लिन पेशेंट’ म्हणूनही ओळखले जाते. ही व्यक्ती 2008 मध्ये एड्समुक्त झाल्याचे सांगण्यात आले होते. आता तब्बल 10 वर्षांनी दुसरी व्यक्ती एचआयव्ही मुक्त झाली आहे. दरम्यान सध्या जगात 3 कोटीहून अधिक लोक एचआयव्ही रोगाने ग्रस्त आहेत. 1980 मध्ये सुरु झालेल्या या रोगामुळे साडे तीन कोटीहून अधिक लोक मरण पावले आहेत. एचआयव्ही विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर रुग्णाची प्रतिकारशक्ती हळू हळू कमी होत जाते. त्यामुळे व्यक्ती हळू हळू खंगत जाऊन त्याचा मृत्यू होतो.