सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात उपाययोजना म्हणून राज्यात लॉकडाऊन (Lockdown) सुरु आहे. तसेच बाहेर पडताना मास्क घालणेही बंधनकारक आहे. मात्र जे लोक नियमांचे पालन करीत नाहीत, अशांवर पोलीस कारवाई करत आहेत. आता नुकतेच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका टिक टॉक (Tik Tok) स्टारवर मास्क न लावण्याबद्दल कारवाई करत, त्याच्याकडून जाहीर माफी वदवून घेतली आहे. या युवकाने मास्क न घालता घराबाहेर पडल्यावर एक व्हिडिओ बनवला होता. आता या युवकाच्या माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
याबाबत मुंबई पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘नियम तोडण्यासाठी नाही तर ते काटेकोरपणे पाळण्यासाठी आहेत, नियमांचे पालन हे आपले प्रथम कर्तव्य आहे. धाडस करतो जो कोणी असे नियम तोडण्याचे... मुंबई पोलीस काम करी त्याला वठणीवर आणण्याचे.’
The moment you break a rule, the clock starts going tick tock - it’s just a matter of time before you face the consequence! #TheSafetyFilter #TakingOnCorona pic.twitter.com/3qC6q0TIsW
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 21, 2020
गोवंडीच्या शिवाजीनगर भागात राहणाऱ्या व स्वतःला टिक टॉक स्टार म्हणवणाऱ्या युवकांनी घराबाहेर पडल्यावर मास्क न घालता एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये तो म्हणाला होता की, ‘आम्ही सेलेब्ज आहोत आम्हाला पोलीस काही करू शकत नाही.’ त्यानंतर पोलिसांनी या युवकांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पोलिसांनी यांच्या विरुद्ध आयपीसीच्या कलम 188, 269 अन्वयेसह महाराष्ट्र कोरोना व्हायरस प्रतिबंध अधिनियम 11 अन्वये लॉक-डाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर नोंदविला. त्यानंतर माफी मागून घेतली, हा युवक माफी मागतानाचा व्हिडिओ पोलिसांनी शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये तरुणाने आपण मास्क न घातल्याने पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले व आता याबद्दल आपण जाहीर माफी मागतो आहोत, असे सांगितले आहे. नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. सलीम शेख आणि मोहम्मद फहाद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.