Spring Season 2021 Google Doodle: वसंत ऋतूच्या (Spring Season) स्वागतासाठी गुगलने (Google) रंगीबेरंगी डूडल (Doodle) साकारले आहे. आज म्हणजेच 20 मार्चपासून उत्तर गोलार्धात वसंत ऋतूला सुरु होईल आणि 21 जूनपर्यंत कायम असेल. हा काळ 'फुलांचा हंगाम' म्हणूनही ओळखला जातो. आजच्या दिवसाला 'Spring Equinox' असेही म्हणतात. याचा अर्थ वसंत ऋतूतील आजचा पहिला दिवस असून सूर्य आज दक्षिणेकडून उत्तरेकडील गोलार्धकडे जात विषुववृत्त ओलांडेल.
Spring equinox या दिवशी पृथ्वीची कक्षा सुर्याकडे झुकलेली नसते. 21 मार्च हा 'विषुवदिन' असून या दिवशी दिवस आणि रात्र समान म्हणजे 12 तासांचे असतात. उत्तर गोलार्धाकडील लोकांच्या वसंत ऋतूतील भावना या डूडल द्वारे प्रकट होत आहेत. फुलं, मधमाशा आणि हेजहॉग यांनी हे डुडल साकारण्यात आले आहे. हेजहॉग हा प्राणी साधारणपणे चॉकलेटी रंगाचा असतो आणि त्याच्या पाठीवर डोकेरी आवरण असते. मात्र डुडलमध्ये हेजहॉग सुंदर रंगीबेरंगी फुलांनी नटलेला दिसत आहे.
झाडं, फुलं यांच्या पुर्नजिवीत होण्याचा हा हंगाम असतो. कडक थंडीच्या महिन्यांना मागे सोडून उन्हाळ्याच्या दिशेने वाटचाल करणारा हा दिवस. याचा आनंद कुटुंबियांसोबत घेतला जातो. येणारा वसंत ऋतू सर्वत्र आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण घेऊन येवो, अशी आशा करुया.
जगातील महत्त्वाचे दिवस, सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी सर्च जाएंट गुगल कधीच विसरत नाही. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा वाढदिवस, नवीन हंगामाची सुरुवात किंवा एखादा सण गुगलकडून अगदी सुंदर डूडल साकारुन सेलिब्रेट केला जातो. या डुडलमधून त्या सण किंवा उत्सवाविषयी आपल्या भावना जागृत होतात.