धक्कादायक! भारताची मान शरमेने खाली; बाली येथील हॉटेलमधून कुटुंबाने चोरले हँगर्स, भांड्यांसह सर्व सामान (Video)
कुटुंबाने चोरलेल्या वस्तू (संग्रहित-संपादित प्रतिमा)

भारताची (India) विविध क्षेत्रातील प्रगती वाखाणण्याजोगी आहे. चित्रपट, खेळ, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात भारताने आख्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र याच भारतात असेही अनेक लोक राहत्तात ज्यांच्यामुळे भारताची प्रतिमा मलीन होत आहे. असेच एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. बाली (Bali) येथे सुट्टी व्यतीत करण्यासाठी गेलेल्या भारतीय कुटुंबाने  (Indian Family) हॉटेलमधील जितके शक्य होईल तितके समान चोरी करण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमधून बाहेर पडताना जेव्हा या कुटुंबाच्या बॅग्ज स्कॅन करण्यात आल्या तेव्हा, हॉटेल मधील कर्मचाऱ्यांना या सर्व गोष्टी मिळाल्या. सध्या या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की कुटुंबातील ही महिला त्यांचे सुटकेस तपासणाऱ्या हॉटेलमधील अधिका-यांशी वाद घालत आहे. या कुटुंबाने चोरी केलेल्या वस्तूही व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ज्यामध्ये अनेक सजावटीच्या गोष्टी, प्रसाधनगृह, इलेक्ट्रॉनिक्स, टॉवेल्स, भांडी आणि इतर साहित्य आहे. हॉटेलच्या खोलीतून अगदी  हँगर्ससह सर्वकाही चोरून घेऊन जाण्याच्या या कुटुंबाचा प्रयत्न होता. (हेही वाचा: ऑस्ट्रेलियात दुकानातील सामान चोरी केल्याच्या आरोपात एअर इंडियाचा कॅप्टन रोहित भसीन निलंबित)

आता आपले पितळ उघड पडत आहे हे लक्षात आल्यावर हे कुटुंब पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे हॉटेलचे अधिकारी त्याला साफ नकार देतात. 27 जुलै रोजी हेमंत या व्यक्तीने ट्विट करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. भारतासाठी ही अत्यंत शरमेची गोष्ट असल्याचे हेमंत म्हणतो. त्यानंतर हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला. अनेक भारतीयांनी या व्हिडीओखाली कमेंट करून आपला राग व्यक्त केला आहे. काहींनी तर या कुटुंबाचे पासपोर्ट रद्द करा असे म्हटले आहे.