Coronavirus in Lions: बार्सिलोना प्राणिसंग्रहालयातील 4 सिंहांना कोरोना विषाणूची लागण; Big Cats ना COVID-19 होण्याची दुसरीच घटना
Lions test positive for COVID-19 (Photo Credits: Pixabay)

स्पेन (Spain) मधील बार्सिलोना प्राणिसंग्रहालयातील (Barcelona Zoo) 4 सिंहाचा कोरोना विषाणू (Coronavirus) चाचणी निकाल सकारात्मक आला आहे. सिंहाला कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी मोठी बाब असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. या चार सिंहांमध्ये झाला, निमा आणि रन रन या तीन मादी सिंहाचा आणि किम्बे नावाच्या नर सिंहांचा समावेश आहे. या सिंहांपैकी पुरुष सिंहाचे वय चार वर्षे आहे आणि सर्व मादी सिंहांचे वय 16 वर्षे आहे. हा सिंहांची देखभाल करणार्‍या लोकांना त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणे आढळली, त्यानंतर चौघांचीही तपासणी केली असता या चारही सिंहांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले.

गेल्या महिन्यात प्राणीसंग्रहालयातील दोन कर्मचारी कोरोनासाठी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, या ठिकाणी इतरही अनेकांना हा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. आता या सिंहांना संसर्ग कसा झाला याचा अभ्यास प्राणीसंग्रहालय अधिकारी करीत आहेत. ज्याप्रकारे माणसांची PCR टेस्ट केली जाते त्याचप्रकारे सिंहांचीही अशीच चाचणी केली गेली. त्यानंतर बार्सिलोनाच्या पशुवैद्यकीय सेवेने न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात आपल्या भागीदारांशी संपर्क साधला. त्या ठिकाणी एप्रिलमध्ये चार वाघ आणि तीन सिंहांची कोरोना चाचणी निकाल सकारात्मक आला होता.

स्पेन व्यतिरिक्त न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालय हे एकमेव प्राणीसंग्रहालय आहे जेथे सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्याकडे कोरोनासंक्रमित सिंहावर उपचार करण्याचा अनुभव आहे. ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील सर्व सिंह नंतर कोरोना-मुक्त झाले होते.

बार्सिलोना प्राणिसंग्रहालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या प्राणिसंग्रहालयाने ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय सेवेसारख्या आंतरराष्ट्रीय तज्ञांशी संपर्क साधला आणि त्यांनी मदतही केली आहे. याआधी फक्त ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात प्राण्यांमध्ये Sars-CoV-2 नोंदविला गेला आहे. सिंहाची क्लिनिकल स्थिती अतिशय सौम्य फ्लूची होती, ज्यामध्ये त्यांना योग्य उपचार दिले गेले आहेत. सध्या या सिंहांचे योग्य परीक्षण केले जात आहेत. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे या सिंहांमुळे इतर प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही.