प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Lovedbyparents)

तब्बल 10 वर्षे कोमात असलेल्या महिलेने एका मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे. ही महिला गेली 10 वर्षे अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये कोम्यात असल्याने भरती आहे. मात्र आता या महिलेने 29 डिसेंबरला मुलाला जन्म दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलमधील कोणालाच हे कोणाचे कृत्य आहे हे माहित नसल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याबाबत तपास करीत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हॉस्पिटलमधील स्टाफला ही महिला गरोदर असल्याचीही माहिती नव्हती.

या महिलेच्या किंकाळण्याच्या आवाजानंतर जेव्हा हॉस्पिटलमधील लोकांनी तपासणी केली तेव्हा ही महिला गरोदर असल्याचे लक्षात आहे. त्यानंतर या महिलेची प्रसूती झाली. दरम्यान पोलीस या कृत्यामागे नक्की कोणाचा हात आहे याचा तपास करीत आहेत. याबाबत हॉस्पिटलमधीलच स्टाफवर संशयाची सुई आहे. पिडीतेच्या वकिलांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पोलीसदेखील या गोष्टीचा विचार करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेली दहा वर्षे एका हॉस्पिटलमध्ये कोमात असणारी महिला गरोदर होतेच कशी? आणि याबाबत कोणालाही काहीच कल्पना कशी नसते? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.