Photo Credit- X

मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील (Worli Hit and Run Case) प्रमुख आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला पोलिसांनी आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून, मिहीरने पोलिसांना दिलेला कबुलीजबाब वाचून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तो आता 30 जुलैपर्यंत कोठडीत राहील. मिहीर शाह याने 7 जुलै रोजी पहाटे वरळी परिसरात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू (BMW) कार चालवत एका दाम्पत्याला उडवलं होतं. या भयंकर अपघातात कावेरी नाखवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (हेही वाचा - Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीने पबमध्ये बनावट ओळखपत्र वापरले; पबच्या व्यवस्थापनाचा दावा)

या अपघातानंतर मिहीर फरार होता. मात्र दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मिहीरला अटक करण्यात आली. अपघात झाल्यानंतर मिहीरने पलायन केलं होतं. तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. दाढी व केस कापून मिहीर फरार झाला होता, त्याने फोनही बंद ठेवला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने 60 तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केलं होतं. न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याची 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

मिहीर शाहला मद्यप्राशन करण्याचं व्यसन आहे. त्याने स्वतःच पोलीस चौकशीत याची कबुली दिली आहे. अटक केल्यानंतर त्याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दरम्यान त्याची जी चौकशी झाली त्या चौकशीत त्याने मद्यप्राशन करण्याच्या सवयीबद्दल सांगितलं होतं. अपघात केल्यानंतर मिहीर शाहने वरळीतून पळ काढला होता.